मराठी भाषेत स्टेटस ठेवलं म्हणून तिघांना अटक, बेळगावात कर्नाटक पोलिसांची दादागिरी
बेळगावात संतप्त प्रतिक्रिया, कर्नाटकात मराठी ची गळचेपी
बेळगाव,टीम----
मोबाईलवर मराठी स्टेटस ठेवल्यामुळे बेळगावात 3 मराठी मुलांना अटक करण्यात आली आहे.कर्नाटक ग्रामीण पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली असून या धक्कादायक प्रकारामुळे कर्नाटक पोलिसांवर टीका केली जातेय. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मागील काही दिवसांपासून मराठी आणि कानडी भाषिक संघटनांमध्ये संघर्षाच्या घटना घटतायत. या पार्श्वभूमीवर आता बेळागावात तीन मराठी तरुणांना अटक करण्यात आलंय. निखिल केसरकर, विशाल छप्रे आणि दिगंबर डेळेकर अशी अटक करण्यात आलेल्या मराठी मुलांची नावं आहेत.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार निखिल केसरकर, विशाल छप्रे, दिगंबर डेळेकर या तीन मुलांनी त्यांच्या मोबाईलवर मराठी भाषेत स्टेटस ठेवले होते. फक्त मराठी स्टेटस ठेवल्याचे कारण देत बेळगावातील ग्रामीण पोलिसांनी या तिन्ही तरुणांना अटक केलंय. एकीकडे कन्नड रक्षण वेदिलेच्या कार्यकात्यांनी पोलिसांसमोर मराठी पाट्यांना काळे फासण्याची घटना मागील काही दिवसांपूर्वी घडली. यावेळी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पोलिसांनी कन्नड कार्यकर्त्यांना पकडले नाही, असा आरोप होतोय. मात्र, आज मराठी मुलांनी फक्त मराठी स्टेटस ठेवले म्हणून त्यांना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या सर्व प्रकारमुळे येथील स्थानिक मराठी संघटना आणि तरुणांमध्ये संतापाची तीव्र भावना पसरली आहे.
** शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला काळे फासण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात सध्या तणावाचं वातावरण आहे. शुक्रवारी (12 मार्च) बेळगाव शहरातील रामलिंग खिंड येथील शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यर्त्यांनी हल्ला केला. पोलीस संरक्षण असतानाही हा प्रकार घडल्यामुळे सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या हल्ल्यात रुग्णवाहिकेचा बोर्ड तोडण्यात आला आहे. तसेच गाडीला काळे फासण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. यावेळी हा प्रकार घडत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कानडी कार्यकर्त्यांना अडविले त्यानंतर कानडी कार्यकर्ते घटनास्थळावरुन पळून गेले. हा प्रकार घडल्यानंतर येथे काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान, फक्त मराठी स्टेटस ठेवलं म्हणून अटक झाल्यामुळे सध्या महाराष्ट्रातूनसुद्धा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. सध्या तिन्ही तरुणांना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.या प्रकारामुळे कर्नाटक मध्ये मराठी भाषिकांची गळचेपी होत असून या मुळे महाराष्ट्र व कर्नाटक हा अनेक दिवसांपासून असलेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात.