वीज कनेक्शनसाठी सुरू होती शेतकऱ्यांची वणवण,माथी मारले जात होते वीजबिल, बळीराजाने घातला ठिय्या,महावितरण आले ताळ्यावर

वीज कनेक्शनसाठी सुरू होती शेतकऱ्यांची  वणवण,माथी मारले जात होते वीजबिल, बळीराजाने घातला ठिय्या,महावितरण आले ताळ्यावर

मोहोळ,टीम------


मोहोळ तालुक्यातील खंडाळी येथे दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी वीज मिळण्यासाठी कोटेशन भरून 2 वर्षाचा काळ उलटून गेला तरी देखील वीज दिली जात नाही म्हणून शेतकार्यनसोबत बळीराजा शेतकरी संघटनेने वीज मंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तेव्हा आठ दिवसाच्या आत वीज कनेक्शन देण्याचे आश्वासन उपअभियंता हेमंत तापकिरे यांनी दिले.


खंडाळी येथील शेतकरी राजेंद्र मुळे,सचिन मुळे, सुब्राव मुळे ,दत्तात्रय मुळे,तानाजी मुळे व काकासाहेब मुळे यांच्यासह पंधरा ते वीस शेतकऱ्यानी सन २०११ साली शेतामध्ये वीज मिळण्यासाठी अर्ज केला आणि वीज मंडळाच्या नियमानुसार कोटेशन भरले. तसेच वारंवार विजेची मागणी करण्यात आली. यावेळी काही ठिकाणी विजेचे पोल उभे करण्यात आले.तारा ओढून कनेक्शन देण्यात आले नाही. सर्विस कनेक्शन देखील देण्यात आले नाही. मात्र या सर्वांना वीज मंडळ न चुकता वेळेवर मोठ्या प्रमाणात जादा दराने विजेचे बिल  देत आहे.परंतु आज ना उद्या वीज मिळेल या आशेने शेतकरी वीज बिल भरत आहेत.


बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल,सोलापूर जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर,जिल्हाउपाध्यक्ष रमेश भोसले व रामदास खराडे मोहोळ तालुकाध्यक्ष,विठ्ठल ढेकळे, काकासाहेब मुळे,औधुबर सुतार आदींनी वीज मंडळाचे उपअभियंता हेमंत तापकिरे यांची भेट घेतली आणि जोपर्यंत वीज कनेक्शन जोडून दिले जात नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे  सांगितले तेव्हा खडबडून जागे झालेल्या महावीतरने 8 दिवसांच्या आतच वीज देण्याचे आश्वासन दिल्यामुळे ठिय्या  आंदोलन मागे घेण्यात आले.

एकीकडे महावितरण कंपनी सक्तीने वीज बिल वसुली करून सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे आणि दुसरीकडे हीच कंपनी मात्र कनेक्शन देण्यासाठी टाळाटाळ करून  फुगटचे बिल वसूल करण्याचा प्रयत्न करीत आहे.त्यामुळे अश्या हलगर्जी व निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.