औरंगाबाद नंतर आता चक्क झाले उस्मानाबादचे नामांतर
औरंगाबाद नंतर आता उस्मानाबाद चे नामांतर ,
ट्विटर हँडलवर सीएमओने केला उल्लेख
पंढरपूर---महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. नामांतराच्या लढाईमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी उडी घेतली असून जो तो आपल्या परीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आमचेच आहेत याचा कळवळा घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.
औरंगाबाद शहराचा उल्लेख मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर संभाजीनगर असा झाल्यानंतर मोठे राजकीय वादळ उठले .हे वादळ पेटलेले असतांनाच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री ट्विटर हँडलवर उस्मानाबाद चा उल्लेख धाराशिव असा करण्यात आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद च्या नामांतरवरून वरून पुन्हा राजकीय गोंधळ सुरू होणार असल्याचे पहावयास मिळणार आहे.या दोन्ही शहरांचा संभाजीनगर आणि धाराशिव असा उल्लेख करण्यात आला असला तरी त्यासाठी कोणतीही शासकीय अधिसूचना निघाली नाही किंवा तशी चर्चाही मंत्रिमंडळात झाली नाही.औरंगाबाद, उस्मानाबाद या दोन्ही शहरांचे नाव बदलण्यासाठी शिवसेना अनेक वर्षांपासून आग्रही आहे. राज्यात सध्या शिवसेनेचे मुख्यमंत्री सत्तेत विराजमान आहेत. शिवसेनेकडून औरंगाबादचा वारंवार संभाजीनगर असा उल्लेख करण्यात येतो तसा उल्लेख उस्मानाबाद च्या बाबतीत धाराशीव म्हणून केला जात असतो. मात्र नामांतराला सत्तेमध्ये सहभागी असणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून कडाडून विरोध होत आहे.परंतु तरीही औरंगाबाद ते नामांतर संभाजीनगर झालेच पाहिजे अशी आक्रमक भूमिका शिवसेनेतील काही नेत्यांकडून घेतली जात आहे. परंतु ज्या वेळेस राज्यात तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले व त्यांचा समान कार्यक्रम ठरला गेला त्यावेळेस नामांतराचा कुठलेही उल्लेख नसल्याचे काही काँग्रेस नेत्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेमध्ये नामांतरावरून अंतर्गत धुसफूस सुरू असून याचा फायदा भाजप नेत्यांकडून घेतला जात आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने सलग दोन दिवस ट्विटर हँडलवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख केला त्यावरून काँग्रेसने तीव्र शब्दात आक्षेप घेतला होता. आता पुन्हा एकदा या कार्यालयाने उस्मानाबाद चे नामकरण धाराशिव असे केले आहे. मंत्रिमंडळामध्ये उस्मानाबाद येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करणे बाबतचा निर्णय घेतला आहे. परंतु cmo कार्यालयाने धाराशिव- उस्मानाबाद मध्ये हा निर्णय झाल्याचे Cmo ट्विटर हॅण्डल वर टाकले आहे.त्यामुळे औरंगाबाद नंतर आता उस्मानाबाद नामांतरा वरून राजकीय शीतयुद्ध व घमासान सुरू होणार असल्याचे पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे शहरांच्या नामांतराच्या या वादातीत गोष्टींकडे दुर्लक्ष करून ज्या शहरांचे नामांतर करण्याचा घाट घातला जात आहे त्या शहरांमध्ये अगोदर सर्वांगीण विकासाचे राजकारण करून ती शहर स्वच्छ,सुंदर बनवा अशी मागणी औरंगाबाद सह उस्मानाबादच्या नागरिकांकडून आग्रहाने केली जात आहे.तर काँग्रेसने मतांची गोळाबेरीज थोडी बाजूला ठेवून दोन्ही शहरांच्या नामांतराचा संमती द्यावी असाही एक मतप्रवाह पुढे येत आहे परंतु आता सध्यातरी
औरंगाबाद नंतर आता उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न पेटणार हे मात्र निश्चित आहे.