शेडमध्ये तारेने बांधलेल्या दोरीने केला घात, विजेचा धक्का बसल्याने निमगाव येथे 14 वर्षीय नंदिनीचा मृत्यू

शेडमध्ये तारेने बांधलेल्या दोरीने केला घात, विजेचा धक्का बसल्याने निमगाव येथे 14 वर्षीय नंदिनीचा मृत्यू


माळशिरस, टीम-------

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विजेचा शॉक लागून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. निमगाव,नेहरूनगर ता.माळशिरस येथील 14 वर्षीय नंदिनी दीपक ऐवळे हिस राहत्या घरासमोर विजेच्या प्रवाहाचा तीव्र धक्का बसल्याने निधन झाले.

नंदिनी ही बुधवारी दुपारी 1.30 च्या सुमारास आपल्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये तारेने बांधलेल्या दोरीवर कपडे वाळत घालत असताना विजेचा धक्का बसल्याने तिला तात्काळ अकलूज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी नंदिनिस मृत घोषित केले.

   दोन दिवसांपूर्वी निमगाव व परिसरात मोठा पाऊस झाला होता,यामुळे मंगळवारी रात्री उशीरा निमगाव परिसरातील वीज गेली होती परंतु ही गेलेली वीज  बुधवारी दुपारी 1.00 वाजण्याच्या सुमारास आली यानंतर हा प्रकार घडला आहे.निमगाव येथे 33 / 11 केव्हीचे वीज उपकेंद्र असून या उपकेंद्रास वेळापूर वीज केंद्रातून वीज पुरवठा होतो. परंतु निमगाव वीज उपकेंद्राद्वारे वीज पुरवठा करणाऱ्या वीज रोहित्रात अनेक वेळा बिघाड होतात.बऱ्याच वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रा मध्ये बिघाड असल्याने वीज कमी अधिक दाबाने मिळत असते,याचाच फटका दीपक ऐवळे कुटुंबियांस बसला असल्याचे बोलले जात आहे. 14 वर्षीय नंदिनीचा यामुळे मृत्यू झाला आहे, तिच्या निधनाने निमगाव गावावर शोककळा पसरली आहे.सर्व स्तरातून तिच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.तिच्या पश्चात आई ,वडील, एक भाऊ व आजी असा परिवार आहे. बुधवारी शवविच्छेदनानंतर नंदिनीच्या पार्थिवावर निमगाव येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

या धक्कादायक प्रकारामुळे महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबाबत ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.