आला रे...आला ....मोहोळ तालुक्यात बिबट्याची दहशत, 2 जनावरांवर हल्ला,वासराचा पाडला फडशा,शेतकऱ्यांची उडाली झोप

आला रे...आला ....मोहोळ तालुक्यात बिबट्याची दहशत, 2 जनावरांवर हल्ला,वासराचा पाडला फडशा,शेतकऱ्यांची उडाली झोप

मोहोळ,टीम--------

कोरोना महामारीतून सावरत जाणाऱ्या शेतकऱ्यांना आता बिबट्या चांगलाच परेशान करीत असल्याचे दिसत आहे. कारण चिंचोळी एमआयडीसी परिसरात बिबट्या वावरत असल्याच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) येथे बिबट्यासदृश वन्य प्राण्याने इतर दोन जनावरांवर हल्ला करून शेतातील संकरित गाईच्या वासराचा फडशा पाडल्याची घटना मंगळवारी दि.३ ऑगस्ट रोजी पहाटेच्या दरम्यान घडली आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेबाबत शिरापूर सो येथील पीडित शेतकरी दिग्विजय लिंबाजी ताकमोगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताकमोगे यांची शिरापूर येथे शेती आहे. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दिग्विजय ताकमोगे शेतामध्ये पिकाला पाणी देण्याकरिता गावातून शेतामध्ये गेले होते. तेव्हा दावणीला बांधलेली सर्व जनावरे होती. साधारणतः सकाळी साडेसहाच्या दरम्यान पिकाला पाणी देऊन झाल्यानंतर जिथे जनावरे बांधलेली आहेत तिथे आले असता जनावरे उभा राहिलेली दिसली. आसपास पाहिले असता काही रक्ताचे डाग दिसले. तेव्हा दावणीकडे नजर टाकली असता एक जर्सी गाईचे कालवड दिसले नाही. त्याच्या जवळूनच त्याला ओढत घेऊन गेल्याच्या खुणा दिसल्या. त्या दिशेने उसामध्ये आत गेले असता जनावराने वासराचे पोट फाडून खाल्ल्याचे दिसले.

या दरम्यान इतर जनावरांकडे येऊन पाहिले असताना तिथेच बांधलेल्या एका खिलार गाईच्या वासराला व म्हशीच्या रेडक्यावरही हल्ला झाल्याच्या खुणा त्यांच्या शरीरावर दिसून आल्या आहेत. गतवर्षी भोयरे हद्दीतील बिबट्याचा वावर व मागील आठ दिवसांपासून चिंचोली काटी परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तालुक्यामधील विशेषत: शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गाईच्या वासरावर झालेला हल्ला हा बिबट्याचाच का? की बिबट्यासदृश अन्य वन्य प्राण्याचा? याबाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावले जात असून नागरिक भयभीत झाले आहेत,त्यामुळे त्यांना सम्पूर्ण रात्र जागून काढावी लागत आहे.

बिबट्या असल्याचा दुजोरा-----

घटनास्थळी मंगळवारी सकाळी वनरक्षक सचिन कांबळे यांनी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली. या वेळी त्यांनी वन्य प्राण्याचे ठसे पाहिले असता हे ठसे बिबट्या सदृश्य प्राण्याचे आहेत अशी माहिती त्यांनी सांगितली.