मोठा खटाटोप करून सुरू झाली "बस",मात्र लेकी बाळींसह जावई व भावीक मंडळींचा झाला चांगलाच हिरमोड
पंढरपूर,टीम-----
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वकाही आता अनलॉक होऊ लागले आहे.त्यामुळे बऱ्याच दिवसापासून शांत असलेली, एका जागेवर थांबलेली लालपरी आता रस्त्यावर धावू लागली आहे. चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील नागरिकांना देवभूमी पंढरीला जाण्यासाठी हक्काची बस असावी म्हणून "चाळीसगाव-पंढरपूर" ही बस सेवा मोठा खटाटोप करून सुरू केली. मात्र या बसच्या वेळेचा ताळमेळ लागत असल्यामुळे लेकी बाळींसह खान्देश परिसरात जाणाऱ्या जावई मंडळींचा चांगलाच हिरमोड होत असल्याचे दिसत आहे.
खानदेश भागातून पंढरीमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी हजारोच्या संख्येने नागरिक येत असतात.पंढरीत येण्यासाठी या भागातून रेल्वेची सुविधा आहे.मात्र अनेक ठिकाणी चढ-उतार करावी लागते त्यामुळे येथील नागरिकांनी कायमस्वरूपी बस सुरू व्हावी यासाठी खा. उन्मेष पाटील ,आ. मंगेश चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला. प्रयत्नांना यश आले.चाळीसगाव हुन सकाळी 7 वाजता बस सुरू झाली. सात वाजता निघालेली बस दुपारी तीन ते चारच्या दरम्यान पंढरीत पोहोचत आहे. त्यामुळे एखाद-दुसरा मुक्काम करून विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक या बसचा आधार घेऊन पंढरी नगरी मध्ये येत असतात.
पंढरपूर तालुक्यातील उपरी,पळशी,सुपली,गादेगाव ,चळे आंबे, मुंडेवाडी, बंडीशेगाव यासह सांगोल तालुक्यातील बहुतांश गावातील मुली खानदेश भागात विवाह करून दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर खानदेशातील अनेक मुलींचे पंढरपूर सांगोला या भागातील तरुणांची विवाह झाले आहेत. यामुळे पंढरपूर व खानदेश वासीयांची चांगलीच सोयरीक जुळली आहे. त्यामुळे या भागात जाण्यासाठी चाळीसगाव पंढरपूर ही बस हक्काची बस झाली होती. परंतु पंढरपूर चाळीसगाव कडे जाताना या बसच्या वेळेचा कुठलाही ताळमेळ लागत नसल्याचे दिसत आहे. कारण पंढरपूरहून पहाटे 5 ते 5.30 च्या दरम्यान ही बस चाळीसगाव कडे मार्गस्थ होते. मात्र ही वेळ गैरसोयीची असल्याचे दिसत आहे. कारण या वेळेत बस पकडण्यासाठी सर्वांनाच धावपळ करत पंढरीकडे यावे लागते. त्यामुळे किमान बस 7 ते आठच्या दरम्यान पंढरपूरहून सुरू करावी अशी मागणी होत आहे. परंतु नासिक जळगाव एकच प्रदेश आहेत, अर्ध्या अर्ध्या तासाने या भागात जाण्यासाठी बसेस आहेत, त्यामुळे वेळ बदलणे अशक्य आहे.जळगाव आगार प्रमुखांना बोला, अशी उत्तरे आगर प्रमुखांकडून ऐकण्यास मिळत आहेत.
वास्तविक पाहता उत्पन्न वाढून प्रवाशांसह लेकीबाळी सुना नातवंडे जावई यांचा पंढरीकडे येण्याचा प्रवास सुखकर होत आहे. पंढरपूरकडे अनेक गावे जोडली जात असून खान्देश पंढरपूर प्रवास सुखकर होत असतानाही मात्र केवळ बस ची वेळ बदलण्यासाठी टाळाटाळ करून या सर्वांनाच वेठीस धरण्याचा प्रयत्न होत आहे.त्यामुळे बसचा वेळ बदलला तरच खान्देशवासीयांच्या प्रयत्नाला यश मिळेल अन्यथा विठुरायाचे दर्शन दुर्लभ व सर्वांचा हिरमोड निश्चित असल्याचे पहावयास मिळणार आहे.
विठुरायाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी हक्काची बस सुरू व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा केली. खटाटोप करून बस सुरू झाली, मात्र पंढरपूर कडून बस सुटण्याची वेळ अत्यंत गैरसोयीची आहे.पहाटे 5 ऐवजी सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान बस सुरु झाली तर सर्वांनाच त्याचा मोठा फायदा होईल व खान्देश वासीयांसाठी विठुरायाचे दर्शनही सुलभ होईल.
---सुधीर पवार, ता.उपाध्यक्ष रयत सेना, चाळीसगाव