मोहोळ मध्ये बिबट्या पुन्हा मैदानात,जनावरांच्या कळपावर हल्ला,रेडकाची केली शिकार,

मोहोळ मध्ये बिबट्या पुन्हा मैदानात,जनावरांच्या कळपावर हल्ला,रेडकाची केली शिकार,
                                                   (दि.४ जून २०२१)
मोहोळ,टीम-------
 तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून गायब  झालेला      बिबट्या पुन्हा सक्रिय झाला असून भोयरे गावच्या हद्दीतीतील सीना नदीवर असलेल्या घाटणे बँरेज जवळ असलेल्या गोरख बापू जाधव यांच्या वस्तीवरील जनावरांवर गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हल्ला केला आहे. या हल्ल्यात म्हशींचे  एक रेडकू मृत्युमुखी पडले आहे.

      गेल्या काही दिवसांपूर्वी अनगर गावच्या परिसरात बिबट्या दिसल्याचे काही नागरिकांनी सांगितले होते. गेल्या वर्षभरापासून बिबट्या मोहोळ तालुक्यात धुमाकूळ घालत असून त्याने तालुक्यातील अनेक जनावरांचा फडशा पाडला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून बिबट्या गायब झाला होता. बिबट्याला पकडण्यासाठी तालुक्यात अनेक ठिकाणी पिंजरे लावले होते. पण तो हाती लागला नाही.हाच बिबट्या आता पुन्हा नव्या जोमाने 10 महिन्या नंतर मैदानात आला असल्याचे सांगितले जाते आहे. कारण या बिबट्याने जनावरांचा फडशा पडण्याचे काम सुरू केले आहे.

भोयरे गावच्या हद्दीतही बुधवारी रात्री जोराचा पाऊस होता. त्यामुळे जनावरे वस्तीवरील अंगणात तशीच होती. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने जनावरांवर हल्ला केल्याने सैरावैरा झाली. या जनावरांच्या कळपातील एका म्हशीबरोबर बराच वेळ बिबट्याची झटापट झालीअसावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.कारण 10 ते 20 मिनिटे टक्कर देऊनही म्हैस आपल्या रेडकाचा जीव वाचवू शकली नाही.

यावेळी जनावरांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने गोरख बापू जाधव जागे झाले व त्यावेळी बिबट्या म्हशीच्या रेडकाला खात असल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला असल्याचे सांगण्यात आले.

गेल्यावर्षी 16 ऑगस्ट 2020 रोजी येथील सीताराम गुरव यांच्या वस्तीवर बिबट्या दिसला होता. त्या नंतर 3 महिने त्याने घाटने,भोयरे, खरकटने या भागात दहशत माजवली होती.आता पुन्हा 10 महिन्यानंतर हा बिबट्या मैदानात आल्याचे पहावयास मिळत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भोयरे गावात रेडकावर हल्ला केलेला प्राणी बिबट्या सदृश्य आहे असे वन्य प्राण्यांच्या ठशावरून दिसत आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये. मात्र योग्य ती काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी शेतात जात असताना बँटरी, काठी याचा उपयोग करावा. तसेच शक्यतो समूहाने शेतात जावे. वन विभागाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
-सचिन कांबळे,वनसंरक्षक,मोहोळ