शिवरस्त्याला अतिक्रमणाचा विळखा,3 तहसीलदार गेले बदलून,33 फुटाचा रस्ता राहिला फक्त 8 फूट,तालुक्यातील प्रकार

शिवरस्त्याला अतिक्रमणाचा विळखा,3 तहसीलदार गेले बदलून,33 फुटाचा रस्ता राहिला फक्त 8 फूट,तालुक्यातील प्रकार

पंढरपूर,टीम-----

लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले राज्यातील मायबाप सरकार सेवा हमी कायद्या सारखे कायदे करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असते परंतु हा प्रयत्न केवळ कागदोपत्री असल्याचे पहावयास मिळते.कारण सरकारी काम 6 महिने नव्हे तर अनेक वर्षे थांब हा वाईट अनुभव सर्वसामान्य नागरिकांना येत असतो. असाच एक अनुभव उपरी-गादेगाव या दोन गावांच्या शिवेवरून जाणाऱ्या शिवरस्त्याबाबत येत असल्याचे पहावयास मिळत आहे.

सन 2013 पासून हा रस्ता खुला होण्याबाबत एका शेतकऱ्याकडून संघर्ष केला जात आहे, मात्र सात ते आठ वर्षानंतर ही दोन गावांच्या शिवेवरून जाणार व पर्यायी रस्ता म्हणून उपयोगी पडणारा शिवरस्ता खुला झालेला नाही. संतापजनक गोष्ट म्हणजे ते 33 फुटाचा असणारा हा रस्ता आता केवळ फक्त आणि फक्त 8 फुटाचा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे अतिक्रमणाचा विळखा पडलेला रस्ता नेमका कधी खुला होणार हे पाहणे आता महत्त्वाचे झाले आहे.

उपरी व गादेगाव या दोन गावांच्या शिवेवरून जाणारा जवळपास 2 किलोमीटर लांबी असलेला 33 फुटाचा हा रस्ता आहे. या रस्त्यामुळे अनेक गावे एकमेकांशी जोडली जाणार आहे. पंढरपूर-सातारा ,पंढरपूर-कराड या रस्त्याकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याचा उपयोग होऊ शकतो. सदर रस्ता खुला होऊन मिळणेबाबत उपरी येथील शेतकरी सुभाष तुकाराम नागणे हे शासन व प्रशासन दरबारी वारंवार पाठपुरावा करीत आहेत, परंतु सन 2013 पासून सुरू असलेल्या त्यांच्या संघर्षाला काही केल्या यश येत नसल्याचे दिसत आहे. रस्ता खुला करुन देण्याबाबत तत्कालीन तहसीलदार गजानन गुरव यांच्या काळात आठ फुटाचे अतिक्रमण काढले गेले होते, त्यानंतर तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी शेतकऱ्यांना नोटिसा देऊन अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांच्या कार्यकाळातही प्रयत्न झाले परंतु या सर्व प्रयत्नांना अपयश आल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे 33 फुट असणारा शिवरस्ता  आज केवळ 8 फूट शिल्लक राहिला आहे.

हा शिव रस्ता खुला झाला तर मोठ्या प्रमाणात सर्व सामान्य नागरिकांसह,वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे,जवळचा शॉर्टकट मार्ग म्हणून दोन महत्वाची गावे जोडली जाणार आहेत, तर आषाढी यात्रा कालावधीत बायपास म्हणूनही या रस्त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे 3 तहसीलदार बदलून गेले असतील व जर गेल्या 8 वर्षापासून शिवरस्ता खुला करण्यासाठी संघर्ष सुरू असेल तर नक्कीच सर्वसामान्य जनतेसाठी सरकार आहे का हा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.