‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम आला पुन्हा चर्चेत,निलेश साबळेंनी मागितली चक्क नारायण राणेंची माफी

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम आला पुन्हा चर्चेत,निलेश साबळेंनी मागितली चक्क नारायण राणेंची माफी

मुंबई,टीम-------

राज्यासह,देशभरात झी मराठी वाहिनीवर सध्या सर्वात लोकप्रिय आणि आवडीने पाहिला जाणारा चला हवा येऊ द्या हा कॉमेडी मराठी शो सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या शोमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पात्र दाखवण्यात आल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला गेला. राणे समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.त्यामुळे  हा कार्यक्रम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे व त्यांच्या टीमने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली आहे.पण सर्वांना खळखळून हसवत ठेवणारा हा कार्यक्रम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


‘चला हवा येऊ द्या’ चे सूत्रसंचालक निलेश साबळे आणि टीमने मंगळवार दि.23 नोव्हेंबर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. झी टीव्ही वर नुकत्याच झालेल्या ‘दिवाळी अधिवेशन’ या कार्यक्रमात मंत्री राणे यांचे हुबेहूब पात्र दाखविण्यात आले होते. या पात्रावर राणे समर्थकांनी तीव्र आक्षेप नोंदविला होता. अनेक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या.त्यामुळे राणे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी झी टीव्ही,झी मराठी आणि डॉ.निलेश साबळे यांना फोन करून संताप व्यक्त केला होता. त्यामुळे चला हवा येऊ द्या च्या  टीमने राणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत दिलगिरी व्यक्त केली. यावेळी आ. नितेश राणे देखील उपस्थित होते.


मंत्री नारायण राणे हे  ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे रसिक प्रेक्षक आहेत. त्यांनी कलाकारांचा नेहमी सन्मान केला आहे. अशावेळी एखादी व्यक्तिरेखा साकारताना कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. परत अशी चूक होणार नाही. असे डॉ. निलेश साबळे यांनी  सांगितले.


 चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमाचे पूर्ण महाराष्ट्रभर चाहते आहेत. या कार्यक्रमात साकारण्यात आलेली पात्रे नंतर कित्येक महिने लोकांच्या स्मरणात राहतात. लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंतच्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाचे वेड आहे. मात्र नारायण राणेंची पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवले गेल्यामुळे हा कार्यक्रम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.या कार्यक्रमात राजकीय मंडळींचे अनेकदा हुबेहूब चित्रण करून विबंडनात्मक  पात्र उभे करत सर्वसामान्य जनतेला हसवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु हा प्रयत्न अनेकदा राजकीय नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रुचत नसल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे विनोदाचे कार्यक्रम सादर करत असताना कलाकार मंडळींनी संबंधित नेते मंडळीच्या राज्यासह व देशातील मानसन्मान व कार्याचा आदर राखून कार्यक्रम करावेत  अशीही मागणी होताना पहावयास मिळत आहे.