महाविकास आघाडीत बिघाडी तर भाजपमध्येही घरात बंडखोरी,विजयासाठी सर्वच पक्षांना करावी लागणार कसरत

महाविकास आघाडीत बिघाडी तर भाजपमध्येही घरात बंडखोरी,विजयासाठी सर्वच पक्षांना करावी लागणार कसरत

पंढरपूर,टीम---

स्व. आ. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षांसह इतर उमेदवारांनीही अर्ज दाखल केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला उमेदवार स्वतंत्र उतरविला असून सदर उमेदवाराला पक्षाचा एबीफार्मही दिला आहे. शिवसेनेमध्ये अगोदरच बंडखोरी झाली आहे. तर भाजपमध्येही पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्‍वर आवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पोटनिवडणूकीत विजयश्री आपल्याकडे खेचून आण्यासाठी सर्वच पक्षांना रणरणत्या उन्हात तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
सदर पोटनिवडणूकही भाजप विरूद्ध राष्ट्रवादी अशी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र महाविकास आघाडीमधीलच प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत बंडखोरी झाली. सेनेच्या वतीने महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला सुरूवात केली आहे. तर आघाडीचा घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही युवक कार्यकर्ते सचिन पाटील यांना उमेदवारी देऊन मैदानात उतरविले. एवढेच नव्हेतर पाटील यांना पक्षाचा अधिकृत एबीफार्म दिला आहे. संघटनेच्या वतीने दि. 4 एप्रिल रोजी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे मोठी सभा घेणार असून मतदार संघातील प्रत्येक पंचायत समिती व झेडपी गणात प्रचाराच्या तोफा धडकणार आहेत. यासाठी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जालिंदर पाटील, पुजाताई मोरे, रसिका ढगे आदी वक्ते येणार असून निवडणूक पार पडेपर्यंत मा.खा. राजू शेट्टी व इतर मंडळी तळ ठोकून राहणार असल्याची माहिती राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी दिली आहे.

वास्तविक पाहता भाजपसह राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून आम्ही सर्व एकत्र आहोत असे सांगितले जात आहे. मात्र तरीही दुसरीकडे बंडखोरी केलेल्या उमेदवाराने प्रचाराचा धुराळा सुरू ठेवला आहे. त्यामुळे सोपी वाटणारी ही निवडणूक दिवसेंदिवस अवघड होत जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये घरातच झालेली बंडखोरी व महाविकास आघाडीत झालेली बिघाडी नेमकी कधी दुरूस्त होतेय हे पाहणे मात्र औत्सुक्याचे झाले आहे. कारण प्रचारासाठी अनेक मातब्बर मंडळी या मतदार संघात येऊन जनतेकडे मतांचा जोगवा मागणार आहेत.