सोलापूर लोकसभा निवडणुकित चिमणी प्रकरण ठरणार किंग मेकर,पडलेली चिमणी देणार धक्का,मतपेटीतून बाहेर पडणार आक्रोश

सोलापूर लोकसभा निवडणुकित चिमणी प्रकरण ठरणार किंग मेकर,पडलेली चिमणी देणार धक्का,मतपेटीतून  बाहेर पडणार आक्रोश

लिंगायत समाजाचा प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा, चिमणी प्रकरणाचा मतदानातून बदला घ्या-काडादी

सोलापूर,टीम----

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना लिंगायत समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे. वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक शुक्रवारी सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक तशा सिद्धेश्वर मंदिराचे विश्वस्त धर्मराज काडादी यांनी आयोजित केली होती. या बैठकीत सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन काडादी यांनी चिमणी प्रकरणाचा उल्लेख करत आपली भूमिका स्पष्ट केली.

या बैठकीत बोलताना धर्मराज काडादी म्हणाले,आ. प्रणिती शिंदे यांनी चिमणी पाडल्यानंतर तात्काळ साखर कारखाना स्थळावर येऊन पाहणी केली. तसेच सर्व कामगारांना यावेळी त्यांनी धीर दिला होता. प्रणितींच्या अंगात काम करण्याची धमक आहे. आपल्या सिद्धेश्वर कारखान्याचे दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ अशा पाच तालुक्यांमध्ये सभासद आहेत. यावेळी मी स्वतः लक्ष घालून सर्व तालुक्यात फिरून सभासदांची एक बैठक घेणार आहे. या बैठकीत मी सभासदांना, ज्यांनी मला त्रास दिला, कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त केले, अशा भाजपला चारी मुंड्या चित करा आणि प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी राहा, जाहीर आवाहन करणार आहे. 

आ.प्रणिती यांनी विधानसभा सभागृहात सुद्धा आपल्या सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा विषय वेळोवेळी मांडला आणि सरकारच्या या निर्णयाविरोधात धारेवर धरले होते. सुशीलकुमार शिंदे यांनीही यात्रेवेळी रस्त्याच्या विषयी स्वतः मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला होता, याची आठवण काडादी यांनी यावेळी उपस्थितांना करून दिली. 

या प्रसंगी या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, मा. आ. विश्वनाथ चाकोते, बाजार समितीचे संचालक अमर पाटील, केदार उंबरजे, अशोक पाटील, मा. सभापती मल्लिकार्जुन पाटील, शिवयोगी शास्त्री हिरेमठ, सिध्दाराम चाकोते, शंकर पाटील, रामदास फताटे, अनिल सिंदगी, हरिष पाटील, विजयकुमार हत्तूरे, रमेश बावी, सकलेश बाभूळगावकर यांच्यासह सिद्धेश्वर साखर कारखाना, सिद्धेश्वर देवस्थान, सिद्धेश्वर शिक्षण संस्था, सिद्धेश्वर बाजार समिती पदाधिकारी सह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे यांनी प्रास्ताविक केले.