पंढरीत शासकीय इमारतींचे नशीब उजळले,नवीन शासकीय विश्रामगृहाला मिळाले 21 कोटी,सर्व कार्यालये एकाच ठिकाणी येण्याची प्रतीक्षा मात्र कायम

पंढरीत  शासकीय इमारतींचे नशीब उजळले,नवीन शासकीय विश्रामगृहाला मिळाले 21 कोटी,सर्व कार्यालये एकाच ठिकाणी येण्याची प्रतीक्षा मात्र कायम

सुसज्ज कार्यालयात नागरिकांना सुलभ व तात्काळ सेवा उपलब्ध होईल

                      -सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

पंढरपूर,टीम ---------

सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालय ही चांगली  व सुसज्ज असली पाहिजे. यामुळे कार्यालयीन काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना या सुसज्ज कार्यालयात सुलभ व तात्काळ सेवा उपलब्ध होईल.असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी केले.

                  सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर सां.बा उपविभाग पंढरपूर व सां.बा उपविभाग (रोहयो), पंढरपूर या कार्यालयीन इमारतीचे व  नवीन शासकीय विश्रामगृह इमारत बांधकाम भूमिपूजन तसेच (मायणी- दिघंची- महुद- पंढरपूर व जिल्हा हद्द पंढरपूर) अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण (श्री. संत एकनाथ महाराज पालखी मार्ग) सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आ. समाधान आवताडे, मा.आ. प्रशांत परिचारक, सां.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता संजय माळी, तहसिलदार सचिन लंगुटे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, दत्तात्रय गावडे, हेमंत चौगुले, उपअभियंता भीमाशंकर मेटकरी, अशोक मुलगीर  उपस्थित होते.

               याप्रसंगी  रवींद्र चव्हाण म्हणाले, राज्यातील सर्वच सार्वजनिक विभागाची कार्यालय सुसज्ज व दर्जेदार करण्यात येणार आहेत. पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम उप विभागीय नवीन कार्यालयाच्या इमारत बांधकाम लवकरात लवकर सुरुवात करून वेळेत काम पूर्ण करावे, अशा सूचना मंत्री चव्हाण यांनी  दिल्या.

           उपविभागीय अभियंता कार्यालय बांधकामासाठी 6 कोटी 37 लाख 51 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये तळमजला, पहिला मजला , संरक्षक भिंत,अंतर्गत रस्ते, परिसर सुशोभीकरण आदी कामे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नवीन शासकीय विश्रामगृह इमारतीच्या बांधकामासाठी 21 कोटी 14 लाख 67 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामधून  विश्रामगृहाच्या तळमजलामध्ये 10 साधे कक्ष, पहिला मजला येथे 07 साधे कक्ष, मा.उपमुख्यमंत्री महोदय एक कक्ष  व दोन व्ही.आय.पी कक्ष तसेच दुसरा मजला येथे 07 साधे कक्ष, मा.मुख्यमंत्री महोदय एक कक्ष व दोन व्हिआयपी कक्ष प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती सां.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता संजय माळी यांनी दिली.

पंढरपूर शहरांमधील सर्व शासकीय कार्यालये एकाच जागेत करावे ही शहर व तालुका वसियांची मागणी मात्र आजही अपूर्णच असल्याचे पहावयास मिळाले आहे.