पंढरपूरात घडली खळबळजनक घटना ! चक्क एका मुतारीने तळ्यात उडी मारून संपविले जीवन,नेटकऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली
पंढरपूर,प्रतिनिधी -----
गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराची सोशल मीडियावर चांगलीच पोलखोल होत असल्यामुळे नेटकऱ्यांमधून चांगलीच खिल्ली उडविली जात आहे.आता अशीच एक भन्नाट पोस्ट व्हायरल झाली आहे, यामधे चक्क एका निर्जीव मुतारीने आत्महत्या केल्याचे पहावयास मिळत आहे त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्षम असणाऱ्या पंढरपूर नगरपरिषदेवर जोरदार हल्लबोल सुरू झाला आहे .
येथील पंढरपूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या जाचास कंटाळून यमाई - तुकाई मंदिरा शेजारील स्व.यशवंतराव चव्हाण जलाशयाच्या ट्रॅक जवळील तळ्यात उडी मारुन या निर्जीव असलेल्या मुतारीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पंढरपूर मध्ये घडली आहे.
मुतारीचे प्रेत तळ्याकाठी तरंगताना नागरीकांना आढळून आले आहे.त्यामुळे ट्रॅकवर फिरायला येणार्या सर्वसामान्य नागरिकांसह काही प्रतिष्ठित मान्यवरांसह अनेकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे.काही जनांनी तर मुतारीची आत्महत्या नसून आरोग्य विभागाने केलेली हत्या असल्याचा खळबळ जनक दावा केलेला आहे.
याबाबत नगरपरिषदे कडे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता,त्यांना सध्या चंद्रावरील खड्डे मुरमाने बुजवण्याचे इस्त्रो कडून काम मिळाल्यामुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.अशीही पोस्ट व्हायरल झाली आहे.एवढेच नव्हे तर मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना सर्वात आधी कळविण्याची प्रथा असल्यामुळे आम्ही सोशल मिडीया द्वारे पंढरपूर नगरपरिषदेस ही दु:खद घटना कळवित आहे असे सांगत या मुतारीला भावपुर्ण आदरांजलीही काही नेटकऱ्यांनी वाहिली आहे.
याबाबत आम्ही शोकाकुल असल्याची पोस्ट पंढरपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष व कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठान,पंढरपूर चे संस्थापक अमरजित पाटील केली आहे.
सदर पोस्ट वर श्रद्धांजली वाहण्यासाठी नेटकऱ्यांनी मोठी गर्दी केली असून कमेंट्स द्वारे आदरांजली वाहिली जात आहे.
यामुळे नेटकऱ्यांकडून आप आपल्या भाषेत स्वतःला सक्षम म्हणून मिरवणाऱ्या व यात्रा काळात कोट्यवधींचे उत्पन्न पदरात पाडून घेणाऱ्या पंढरपूर नगरपरिषदच्या या अजब गजब कारभाराचा खरपूस भाषेत समाचार घेतला जात असून सोशल मीडियाही चांगलाच एकटिव झाला आहे.
.