मोहोळ,टीम-----
ग्रामीण भागात ग्रामसेवक व तलाठी हे गावाच्या सर्वांगीण विकासाचे महत्वाचे दूत असतात.त्यांच्या मुळे गावाचा कायापालट होत असतो त्यामुळे या दोन्ही पदांना गावात मोठा मानसन्मान असतो परंतु काही जणांच्या अयोग्य वागणुकीमुळे हि भाऊसाहेब मंडळी चांगलीच बदनाम होत आहे.खवणी, ता. मोहोळ येथील ग्रामसेवक व गावकामगार तलाठी कोरोना महामारीच्या कार्यकाळात सतत गैरहजर असल्याने या प्रकरणी वरिष्ठांना लेखी तक्रार देऊन देखील कोणतीही दखल घेतली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आहे.
याप्रकरणी योग्य ती कार्यवाही होईपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, नव्याने सत्तेवर आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची पहिली मासिक सभा दि. ३ मार्च रोजी घेण्यात आली होती. तथापी ग्रामसेवक मिलिंद तांबीले यांनी ग्रा.पं.सदस्यांना ग्रामपंचायतीची कोणतीही माहिती उपलब्ध करून न दिल्याने सदरची ग्रामसभा तहकूब केली होती. तहकूब केलेली पहिली मासिक सभा अद्याप पर्यंत घेतलेली नसल्याचे व सदर तहकूब ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीचे दप्तर, बॅंक खाते पुस्तक व ग्रामपंचायतीचे दप्तर उपलब्ध करुन दिले नाही. तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायत कामकाजाबाबत कसलीही माहिती न देता त्यांना दमदाटी केल्याची तक्रार मुख्याधिकारी जि. प., गटविकास अधिकारी पं. स. मोहोळ यांना दि. ५ मार्च २०२१ रोजी दिलेली होती. तसेच कोरोना पार्श्वभूमीवर ग्रामसेवक हे ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या दोन महिन्यापासून सतत गैरहजर असल्याची तक्रार सर्व संबंधितांना दिलेली होती. तरीही सबब प्रकरणी वरिष्ठ स्तरावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
सध्या खवणी गावात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना व घ्यावयाची काळजी इत्यादीबाबत गावकऱ्यांचे प्रबोधन करणे, शासनाने व आरोग्य विभागाने कोरोना संसर्गा बाबत वेळोवेळी निर्गत केलेले नियमांची माहिती ग्रामस्थांना समजावून सांगणे आवश्यक आहे. तसेच गावातील सार्वजनिक स्वच्छता, पिण्याचे पाणी, दिवा बत्ती व विज पुरवठा, आरोग्याच्या बाबी इत्यादी मुलभूत समस्या व समस्यांना सामोरे जाताना ग्रामपंचायतीस अनंत अडचणी येत आहेत. तसेच ग्रामस्थांना आरोग्य उपकेंद्र पाटकूल केंद्रामार्फत कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले, त्यावेळी देखिल ग्रामसेवक व तलाठी गैरहजर होते. मागील २०१९-२० अर्थीक वर्षात ग्रामपंचायतीचे विकास कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार न्यायप्रविष्ट आहे. अशा कठीण काळात ग्रामसेवक बेफिकीरपणे सतत कामात कुचराई व गैरहजर असले बाबत ग्रामपंचायतीने लेखी तक्रार दिलेली आहे.
गाव कामगार तलाठी गेली १ वर्ष गावा मध्ये आलेले नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गावात सरपंच यांचे अध्यक्षतेखाली कोविड संसर्ग आजाराबाबत ग्रामस्थांनी घ्यावयाची काळजी व लसीकरणाबाबत बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीला गाव कामगार तलाठी, आरोग्य कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, ता. पं. स. विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) हे गैरहजर असल्याची लेखी तक्रार खवणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सोलापूर, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, उपविभागीय अधिकारी उपविभाग पंढरपूर, गटविकास अधिकारी मोहोळ, तहसीलदार मोहोळ, पोलीस निरीक्षक मोहोळ यांना दिलेली असून सबब प्रकरणी बेजबाबदार ग्रामसेवक व तलाठी यांचेवर तात्काळ योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून त्यांचे ठिकाणी दुसरे ग्रामसेवक व गाव कामगार तलाठी यांची नियुक्ती करण्यात यावी व याप्रकरणी योग्य ती कार्यवाही होईपर्यंत ३१ मे २०२१ पासून खवणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला मौजे खवणी ग्रामस्थांकडून टाळे ठोकण्यात येत आहेत. या प्रकरणी काही अनुचित घडल्यास अथवा कायदेशीर प्रसंग उद्भवल्यास त्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे मौजे खवणी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर सरपंच शीतल यमगर, उपसरपंच सिंधू बोबडे, ग्रा प सदस्य सतीश खिलारे, रेखा भोसले, सुरेखा भोसले, भाजपा अ. जा. मोर्चा प्रदेश सचिव संजीव खिलारे, सूर्यकांत भोसले, सचिन भोसले, महादेव यमगर, तेजस बोबडे, ज्योतीराम भोसले, निखील भोसले, देविदास भोसले, चंद्रकांत गुंड, सचिन शिंदे आदींच्या सह्या आहेत.
** ज्या दिवशी तक्रार झाली आहे त्या दिवशी ग्रामसेवक हजर होते, ग्रामस्थांच्या तक्रारी बाबत विस्तार अधिकाऱ्यांना चौकशी करत नेमलेले आहे त्यांचा अहवाल आल्या नंतर पुढील कारवाई होईल
----गणेश मोरे,गटविकास अधिकारी