पोट निवडणूक सर्वांनाच येतेय अंगलट, रुग्ण संख्येचा विस्फोट, तावशीत शिपायाच्या मृत्यू नंतर सांगोल्यात एका शिक्षकासह घरातील 4 जणांचा मृत्यू , कुटुंब उद्ध्वस्त
पंढरपूर,टीम-----
राज्यात गाजलेली पंढरपूरची पोटनिवडणूक सध्या कोरोनाचा संसर्ग वाढण्यासाठी अतिशय पोषक असल्यामुळे अनेकांना यामुळे प्राण गमवावे लागत असून वाढत्या रुग्ण संख्येमुळे अनेकांना बेड मिळेनासे झाले आहे.परंतु जे या निवडणूक प्रक्रियेत सामील होते त्यांनाही याचा अधिक फटका बसला असून त्यांच्या संसर्गाने इतरांनाही आपले प्राण गमवावे लागत आहेत.तावशी ता.पंढरपूर येथील एका शिपायाच्या मृत्यू नंतर आता सांगोला तालुक्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून केवळ इलेक्शन ड्युटीला आलेल्या शिक्षकासह त्याच्या कुटुंबातील आई, वडील आणि मावशीचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भोवणारी ही निवडणूक आता निवडणूक कामकाजाचे कर्तव्य बजावणाऱ्या नाही अंगलट येत आहे.
पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी सांगोला तालुक्यातील घेरडी येथील प्रमोद माने हे प्राथमिक शिक्षक मतदानाच्या ड्युटीला होते. इथून परत गेल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, आई, वडील आणि मावशी यांनाही कोरोनाची लागण झाली. प्रमोद माने यांच्यावर सुरुवातीला सांगोला इथे उपचार करण्यात आले. मात्र तब्येत खालावल्याने त्यांच्या डॉक्टर भावाने त्यांना मुंबई इथे हलवले. मात्र प्रयत्नांची शिकस्त करुनही प्रमोद माने यांचे निधन झाले. यानंतर त्यांचे वडील वसंतराव, आई शशिकला आणि मावशी जया घोरपडे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. सुदैवाने त्यांची पत्नी आणि मुलाने कोरोनावर मात केली. परंतु या निवडणुकीमुळे केवळ शासकीय ड्युटी करणाऱ्या प्रमोद माने यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पंढरपूर तालुक्यातील तावशी गावात निवडणूक कामकाज पार पडल्यानंतर साधना विद्यालय मधील शिपाई राजकुमार लक्ष्मण यादव यांनाही निवडणुकी नंतर कोरोनाची लागण झाली.अगोदर सांगोला त्या नंतर इस्लामपूर कडे त्यांना ऍडमिट केले केले परंतु तेथे उपचार घेत असताना कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. निवडणुकीच्या अगोदर शिपाई यादव यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे होती नव्हती.निवडणुकीच्या दिवशी त्यांनी दिसवभर मतदारांच्या हाताला शाई लावण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळेच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.
याबाबत संबंधित शाळेने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे शासकीय मदत मिळावी यासाठी प्रस्ताव दिला आहे.
पोटनिवडणुकीत कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका, मोठ्या नेत्यांचे दौरे नियमितपणे सुरु होते. परिणामी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीनंतर परिसरात कोरोनाने कहर केला असून रुग्णसंख्या पाचपटीने वाढली आहे. तर गेल्या 20 दिवसांत 125 हुन अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून दररोज 200 ते 400 च्या पटीत रुग्ण वाढत आहेत.त्यामुळे पंढरपूर सह मंगळवेढ्यात हॉस्पिटल हाऊस फुल्ल झाले असून रुग्णांना नाईजास्तव बाहेर गावी जावून बेड चा शोध घ्यावा लागत आहे.