पोट निवडणुकीने तावशिकरांना दिला मोठा झटका,निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या शिपायाचा कोरोनामुळे मृत्यू, गावात कोरोनाचा विस्फोट
पंढरपूर, टीम----
मागील काही दिवसांपूर्वी पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली होती मात्र विधानसभा पोट निवडणुकीनंतर कोरोनाचा पंढरपूरसह मंगळवेढा तालुक्यात मोठा विस्फोट झाल्याचे पहावयास मिळत आहे. निवडणुकीनंतर दररोज दोनशे ते तीनशे च्या पटीने कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे पंढरपूर मध्ये सध्या बेड मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी पळापळ होत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव सांगली,सातारा, इस्लामपूर कडे धाव घ्यावी लागत आहे.सध्या या पोटनिवडणुकीचा परिणाम अनेक गावांमध्ये दिसून येत असून विशेषता तावशीकर यांना या निवडणुकीने मोठा झटका दिला आहे. कारण निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या एका शिपायाचा कोरोना मुळे मृत्यू झाला असून आजच्या घडीला गावात शेकडो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले जात असून निवडणुकीनंतर चार ते पाच जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
पोटनिवडणुकीच्या अगोदर तावशी ता.पंढरपूर या गावात फारसे कोरोना रुग्ण नव्हते. परंतु निवडणुकीनंतर कोरोनाचा मोठा विस्फोट झाला.
दि.16,17 व 18 एप्रिल या 3 दिवसात येथील साधना विद्यालयातील शिपाई राजकुमार लक्ष्मण यादव यांनी निवडणुकीचे कामकाज केले,निवडणुकीच्या दिवशी त्यांनी 140-A या खोलीत मतदान संपेपर्यंत मतदारांच्या हाताला शाई लावण्याचे काम केले त्यानंतर 23 एप्रिलला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर त्यांना पंढरीत बेड न मिळाल्यामुळे सांगोला,सांगोला टू इस्लामपूर कडे ॲडमिट करण्यात आले. परंतु दि. 30 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांना निवडणुकी अगोदर कोणताही त्रास नव्हता परंतु दिवसभर निवडणुकीचे कामकाज केल्यानंतरच त्यांना ही लागण झाली असल्याचे ग्रामस्थांमधून सांगितले जात आहे.
सदर शिपाई ज्या खोलीमध्ये कामकाज करत होते. त्या खोलीमध्ये इतरही काही जण पॉझिटिव्ह आले आहेत व त्या संबंधित वार्डात निवडणुकीनंतर अचानक 20 ते 25 टन पॉझिटिव्ह आले असून आजमीतिला गावामध्ये शंभर ते सव्वाशे रुग्ण पॉझिटिव असून दोन ते तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत. पोट निवडणुकी मुळेच गावात कोरोना आल्याची चर्चा सुरू होत आहे. कारण निवडणुकी अगोदर ग्रामस्थांनी कोरणा बाबत मोठी काळजी घेतली होती.सगळीकडे सॅनिटायझर करण्याचे काम झाल्यामुळे निवडणुकी अगोदर कोणाचा शिरकाव गावात नव्हता.परंतु ही निवडणूक गावाच्या चांगलीच अंगलट आल्याचे दिसत आहे.
माझे चुलता-चुलती घरातून कुठेही जात नाही त्यामुळे ते सुरक्षित होते.परंतु मतदान केल्यानंतर ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले व या निवडणुकीनंतरच मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले असून आम्ही दररोज तपासणी करत आहोत. सध्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली असून अनेक जण होमआयसोलेशन मध्ये तर काही जण खाजगी व इतर दवाखान्यात उपचार घेत आहेत. ----गणपत यादव,सरपंच तावशी
कर्तव्यावर असताना अचानक मृत्यू झाला तर शासनाकडून संबंधित कर्मचाऱ्याला मदत दिली जाते.परंतु तरीही संबंधित शाळेने आमच्याकडे संबंधित शिपायाचा अहवाल सादर केल्यानंतर त्याबाबत निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करून त्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येइल.--गजानन गुरव,निवडणूक निर्णय अधिकारी
ग्रामस्थांनी कोरोना बाबत मोठी दक्षता घेतली होती.परंतु पोट निवडणूक झाल्यानंतर गावात कोरोनाचा मोठा विस्फोट झाला असून ग्रामस्थ या निवडणुकीमुळे मोठ्या प्रमाणात परेशान झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन तावशीकरांना कोरोनातून मुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे राज्य संघटक राजेंद्र आसबे यांनी केली आहे.
त्यामुळे राजकीय नेते मंडळींना जरी या निवडणूकीने जय पराजय मिळवून दिला असेल तरी मात्र सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाली असल्याचे दररोज वाढणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येवरून दिसत आहे. या मंडळींनी आता सर्वांनाच वाऱ्यावर सोडले असून प्रशासनाची मात्र दमछाक होतांना पहावयास मिळत आहे.