कोरोनामुळे आठशे वर्षापासुनची परंपरा खंडीत,सलग दुसऱ्या वर्षी भैरवनाथाची यात्रा रद्द

कोरोनामुळे  आठशे वर्षापासुनची परंपरा खंडीत,सलग दुसऱ्या वर्षी भैरवनाथाची यात्रा रद्द
अंकोली,टीम-----
 कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंकोली ता. मोहोळ  येथील ग्रामदैवत श्री. भैरवनाथाची सालाबाद प्रमाणे ४ मे पासुन सुरू होणारी यात्रा सलग दुसर्या वर्षीही रद्द करण्यात आली असुन यामुळे सुमारे आठशे वर्षापासुनची परंपरा खंडीत झाली असल्याची माहीती देवस्थान ट्रस्टचे सचिव चंद्रकांत दत्तात्रय पुजारी यांनी दिली.
       गेली आठशे वर्षापासुन येथील ग्रामदैवत श्री. भैरवनाथाची यात्रा लाखो भाविकांच्या साक्षीने चैत्र शुद्ध कालाष्टमीच्या दिवसापासुन सलग तीन दिवस मोठ्या उत्साही वातावरणात साजरी केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानल्या जाणार्या या यात्रेसाठी सोलापुर सह सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई व उस्मानाबाद जिल्ह्यासह कर्नाटक  राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येउन गर्दी करतात.परंतु गतवर्षीपासुन संबंध जगभरात कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे.या महामारीचा नायनाट व्हावा, या हेतुने केंद्र व राज्य सरकारने संचारबंदीचा आदेश देऊन लॉकडाउन जाहीर केले आहे.अशा परस्थितीत  प्रशासनाला सहकार्याची भुमिका घेत भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी ही यात्रा रद्द करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे.
     या यात्रा काळात होणारे वाघ्या मुरळी जागरण गोंधळ,कावडी , मनोरंजना बरोबरच नैवद्य दाखविणे, देवाचा पालखीसह छबिना व देवदर्शन आदीप्रकारचे कार्यक्रम लोकहितासाठी रद्द करण्यात आले आहेत. मात्र धार्मिक विधी व पुजा-अर्चा पुजार्यांकडुन केली जाणार असल्याचे विश्वस्त अजित उर्फ मुन्ना पुजारी व सोमा पुजारी यांनी सांगितले.