राज्यात पुन्हा घडला पहाटेचा  शपथविधी,राष्ट्रवादीने मोडून काढला भाजपचा डाव,सरपंच पदावर पाणी

ग्रामपंजायत मधला  ही भाजपचा डाव  फसला

अहमदनगर टीम-

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विद्यमान उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पहाटेच्या वेळेस घेतलेली ती शपथ आजही जनतेच्या लक्षात आहे.एवढेच नव्हे तर अनेकदा राजकीय पक्ष या शपथेवर टीका करून एकमेकांवर चिखलफेक ही करीत असतात. याच शपथेची पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे परंतु ती राजभवन अथवा वर्षा बंगल्यात नव्हे तर चक्क महादेवाच्या मंदिरात.या मंदिरात रात्रीच्या वेळेस  शपथविधी सोहळा पार पडला  मात्र ही शपथ व मिळालेले सरपंच  पद हे काही काळापुरता च टिकले असून ग्रामपंजायतीत रातोरात मिळवलेल्या सत्तेवरही भाजपला पाणी फिरवावे लागले आहे.त्यामुळे ती शपथ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात लोणी हवेली येथे सरपंचपदाच्या निवडणुकीत हा  किस्सा  घडला आहे.येथे  रातोरात भाजपाने राष्ट्रवादीचा एक सदस्य फोडून त्याला भाजपाच्या बाजूने वळवले, उपसरपंचपदाची ऑफर देऊन  त्याला मध्यरात्रीच महादेवाच्या मंदिरात घेऊन शपथविधी सोहळा पार पाडला. मात्र पुन्हा राष्ट्रवादीने या सदस्याची पुन्हा घरवापसी केल्यामुळे फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाप्रमाणे  भाजपाकडील सरपंचपद ही काही काळापुरता च  ठरवले आहे.या शपथविधी सोहाळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने हा भांडाफोड झाला.

अहमदनगर जिल्ह्यातील  पारनेर तालुक्यातील लोणी हवेली गावात बिनविरोध निवडणुका व्हाव्यात यासाठी आ. निलेश लंके यांनी आवाहन केले होते, परंतु भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, शत्रुघ्न नवघणे यांनी याला विरोध केला. त्यानंतर निवडणुकीत राष्ट्रवादीचे अशोक दुधाडे, जान्हवी बाजीराव कोल्हे, शिवाजी थोरे, सीमा कोल्हे, अमोल दुधाडे असे पाच जण निवडून आले. तर भाजपचे शत्रुघ्न नवघणे, संजीवनी दुधाडे यांच्यासह अन्य दोन असे चार सदस्य निवडून आले. ग्रामपंचायतीत ५ आणि ४ असं बलाबल झालं.त्यामुळे सरपंचपदासाठी भाजपाने राष्ट्रवादीचा सदस्य रातोरात फोडला आणि त्याला उपसरपंचपद देऊ केले. या सदस्याला सोबत घेऊन भाजपाने महादेव मंदिरात मध्यरात्रीच शपथविधी सोहळा उरकून घेतला. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या त्या सदस्याला ५  वर्ष एकत्र राहण्याचे सांगून महादेवाच्या पिडींवर हात ठेवून शपथ घेण्यास सांगितली. दुसऱ्या दिवशी  सकाळी या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर गावात मोठी खळबळ माजली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना ही माहिती समजताना त्यांनी थेट बंडखोर सदस्याचे घर गाठले आणि त्याची समजूत काढून पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी केली त्यामुळे काही तासांसाठी  भाजपाला सरपंच पद मिळाले. त्यानंतर पुन्हा गावात सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक झाली. यात ५-४ च्या मताधिक्याने राष्ट्रवादीच्या जान्हवी दुधाडे या सरपंचपदी, तर उपसरपंचपदी अमोल दुधाडे निवडून आले. रात्रीच शपथ घेतलेल्या भाजपच्या संजीवनी दुधाडे, शत्रुघ्न नवघणे यांना पराभव पत्करावा लागला.त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉग्रेस ने मुख्यमंत्री पदाप्रमाणे रात्रीच्या भाजपच्या शपथेचा डाव मोडीत काढून सरपंच पद आपल्या पदरात पाडून घेतले आहेआणि म्हणून पुन्हा त्या रात्रीच्या शपथेची राज्यात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.कारण ग्रामपंजायतीत खुर्ची मिळवण्याचा भाजपचा हा  राजकीय डाव पुन्हा अधुरा राहिला.