सरपंचपदाच्या आरक्षणाच्या पुन्हा पडणार का चिठ्या ? नेतेमंडळींसह गावपुढार्यांची वाढली धाकधूक
नेतेमंडळींसह गावपुढार्यांची वाढली धाकधूक; जिल्हाधिकाऱ्यांंच्या निर्णयाची लागली आतुरता
। पंढरपूर, टीम-
सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात ६५७ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका पार पडल्या. १५ जानेवारी रोजी झालेल्या निवडणूकांचा निकाल १८ जानेवारी रोजी लागला. त्यानंतर साधारण २७ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्वच १०२८ सरपंचपदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. परंतू या आरक्षण सोडतीमध्ये अनेक तालुक्यांमध्ये आरक्षण काढताना प्रशासनाने गोंधळ केला आहे, आरक्षण सोडत काढताना मागील आरक्षण व लोकसंख्येचा क्रम योग्य प्रकारे विचारात घेतला गेला नाही, दिलेले आरक्षण पुन्हा एकदा पडले अशा अनेक तक्रारी थेट मुंबई उच्च न्यायालयापर्यंत जाऊन धडकल्या. त्यामुळे न्यायालयाने मागील सर्व आरक्षण सोडतीवर दि. १६ फेबु्रवारी पर्यंत स्थगिती लावली आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने फेर आरक्षण सोडत होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे नेतेमंडळींसह गाव पुढार्यांची धाकधूक मात्र चांगलीच वाढली आहे.
कोरोना महामारी आटोक्यात येण्यास सुरूवात झाल्यानंतर जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्यामुळे ८० टक्केहून अधिक मतदान झाले. त्यामुळे निकालही त्याप्रमाणे अनपेक्षित लागले. ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार निवडणूक निकालानंतर २७ जानेवारी रोजी सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढली गेले. मात्र या आरक्षण सोडतीमध्ये प्रशासनाने सावळा गोंधळ केला असल्यामुळे जिल्ह्य्यातील जवळपास १२ ते १५ गावातील मंडळींनी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे दि. ९,११ व १३ फेबु्वारी रोजी होणार्या सरपंच निवडीवर स्थगिती लावण्यात आली आहे. याबाबत मंगळवार दि. ९ फेबु्वारी रोजी जिल्हाधिकारी सर्व तक्रादारांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. त्यानंतरच फाईनल निर्णय होईल. परंतू जर एखाद्या गावचे आरक्षण बदलले गेले तर त्याचा परिणाम इतरही अन्य गावांवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आरक्षण सोडत नव्याने घ्यावी लागणार अशी चर्चा मात्र ठामपणे केली जात आहे. याला सध्या तरी कोणत्याही अधिकार्यांनी दुजोरा दिलेला नाही. मात्र हे निश्चित आहे. पुणे विभागातील ६ जिल्ह्यांमधील सरपंच पदाच्या निवडीला स्थगिती आली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्याचाही समावेश आहे. सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीवर स्थगितीची टांगती तलवार आल्यामुळे पर्यटनास गेलेल्या सदस्यमंडळींसह गाव कारभार्यांचे मात्र चांगलीच चिंता वाढली आहे.कारण आहे ते आरक्षण राहणार का? चिट्टी बदलली जाणार का? हे मात्र आजही गुलदस्त्यातच आहे.
### शेगाव दुमाल्यात बनावट दाखला!
येथे अनुसूचित जाती-जमाती महिला प्रवर्गाकरिता सरपंच आरक्षण सोडत निघाली आहे. परंतू या पदावर विजयी झालेल्या उमेदवाराने जातीचा दाखला बनावट व खोटा दिला असल्याचे निवेदन ७ ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, प्रांताधिकारी, दक्षिण सोलापूर तहसिलदार यांना दिले असून सोबत ज्या ठिकाणाहून दाखला आणला त्या ठिकाणचे कागदपत्र पुराव्यासाठी जोडले आहेत. त्यामुळे या दाखल्याबाबत पुढे काय होतेय याची उत्सुकता वाढली आहे.
## पंढरपूर तालुक्यात इतरही दोन ते तीन गावांमध्ये सरपंच निवडीबाबत स्थगिती देण्यात आले असल्याचे समजते.त्यामुळे या गावांमधील आरक्षण बदलले तर त्याचा परिणाम निश्चितपणे आजूबाजूच्या इतर गावांवर होणार आहे. त्यामुळे फेर आरक्षण होणार असल्याचे ठाम पणे काही कायदे तज्ञांकडून सांगितले जात आहे.परंतु सोमवार दि.८ फेब्रुवारी रोजी इतर गावांबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात.या कडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.