"मिस्टर पती" पोलीस पाटलाची गावात वाढली लुडबुड, गावात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा , ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे धाव,चिंचोलीतील धक्कादायक प्रकार

"मिस्टर पती" पोलीस पाटलाची गावात वाढली लुडबुड, गावात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा , ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे  धाव,चिंचोलीतील धक्कादायक प्रकार

माढा, टीम-----

ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे प्रशासन व शासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा सध्या पोलीस पाटील बनत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही गावातील पोलीस पाटील वादग्रस्त ठरत असल्याचे पहावयास मिळत आहे. पंढरपूर तालुक्यात तर एका पोलिस पाटलाच्या मुलावर वाळूचे गुन्हे दाखल झाले आहेत. आता जिल्ह्यातील एक महिला पोलीस पाटील व त्यांचे पती चर्चेत आले आहेत. कारण त्यांनी नियुक्ती झाल्यापासून कायदा हातामध्ये घेऊन सर्वसामान्यांना त्रास दिल्या बाबतची तक्रार चिंचोली ता. माढा येथील ग्रामस्थांनी  दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या काळामध्ये पोलीस पाटलांनी कायदा हातात घेऊन नागरिकांना मारहाण केली. त्याचबरोबर गावात काही किरकोळ भांडण तंटा व इतर काही तक्रार झाल्यास वादी प्रतिवादी यांना पोलिस ठाण्यांमध्ये बोलून दमदाटी केल्याचाही आरोप गावकऱ्यांनी केला आहे. कोरोना काळामध्ये मास्क लावून गाडीवरून जाणाऱ्यांना विनाकारण अडवणूक लायसन विचारणे, लायसन जवळ नसल्यास 500 रुपये दंड भरण्यास जबरदस्ती करणे,गावातील माहिती चुकीच्या पद्धतीने पोलिसांना सांगून कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणे, किरकोळ कारण काढून पतीकडून विनाकारण मारहाण करणे,असे अनेक आरोप या तक्रारी मध्ये ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांनी याबाबत कुर्डवाडी  प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले असून त्यावर ग्रामपंचायत सदस्य तानाजी लोंढे, कैलास लोंढे, तानाजी देवकुळे,राजकुमार घोडके, दत्तात्रय लोंढे यांच्यासह जवळपास दोनशे नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

महिला पोलिस पाटलांची पती गावातील सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देतात,किरकोळ कारण काढून त्यांच्या पतीकडून मारहाण केली जाते पोलिसांना चुकीची माहिती देऊन गावात दहशद निर्माण करतात.त्यामुळे या सर्व त्रासाला कंटाळून आम्ही प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. प्रांताधिकार्‍यांनी योग्य कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तानाजी लोंढे यांनी केली आहे. तर संबंधितांनी केलेले आरोप तक्रारी चुकीचे आहेत, राजकीय हेतूने माझी व माझ्या पतीची बदनामी करण्याचा प्रकार असल्याचे पोलीस पाटील ज्योती टौंगळे यांनी सांगितले आहे.

या प्रकारामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पोलीस पाटील हे पद चर्चेत आल्याचे पहावयास मिळत असून.ज्या ज्या ठिकाणी महिला पोलीस पाटील आहेत त्या बहुतांश ठिकाणी मिस्टर पती पोलीस पाटील कारभार करत असल्याचे दिसत आहे.