माढ्यातील लोकरे कुटुंबाने केला एक वेगळा रेकॉर्ड,एकाच कुटुंबातील 86 सदस्य झाले कुणबी मराठा,प्रमाणपत्र मिळाल्याने मोठा आनंद

माढ्यातील लोकरे कुटुंबाने केला एक वेगळा रेकॉर्ड,एकाच कुटुंबातील 86 सदस्य झाले कुणबी मराठा,प्रमाणपत्र मिळाल्याने मोठा आनंद

माढा,टीम------

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे अभूतपूर्व यश म्हणून राज्यभरात सध्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडत आहेत,यामुळे समाजबांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत आहे.ज्या ज्या ठिकाणी मोडी लिपीतील नोंदी सापडत आहेत त्या ठिकाणी सदर नोंदी वाचण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे,अश्या आशादायी वातावरणात माढा तालुक्यातील लऊळ या गावातील लोकरे कुटुंब हे कुणबी मराठ्यांचे कुटुंब ठरले असून एकाच परिवारातील 86 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती विलास लोकरे यांनी दिली आहे.यामुळे एकाच कुटुंबातील 86 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळणाऱ्या लोकरे परिवाराने एक वेगळा रेकॉर्ड केला असल्याचे पहावयास मिळत आहे,कारण राज्यातील ही पहिलीच आनंददायी व दिलासादायक घटना घडली आहे.


सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार, राजन जाधव, प्रा.गणेश देशमुख यांच्या हस्ते कुटुंबातील सर्व जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. लऊळ गावातील लोकरे कुटुंबाच्या स्वगृही हा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.आपल्या हक्काचे कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याने सर्वांकडून समाधान व्यक्त केले गेले.

लोकरे कुटुंबातील नंदकुमार वामन लोकरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हे सर्व कुणबी प्रमाणपत्र काढले. त्याचा पूर्ण आहेर देऊन सकल मराठा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित लोकरे कुटुंब आणि नातेवाईकांनी एक मराठा लाख मराठा घोषणा देऊन आनंद व्यक्त केला.

लोकरे कुटुंबाची 1859 ची कुणबी नोंद सापडली आहे त्यामुळे संपूर्ण परिवाराला कुणबी प्रमाणपत्र मिळाले. लोकरे कुटुंब याचा आनंद साजरा करत आहे. परंतु मराठा समाजाने यावर न थांबता प्रत्येक वाड्यावर असे आनंद सोहळे साजरे झाले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न करावेत.
               –माऊली पवार,अध्यक्ष सकल मराठा समाज 


ज्याप्रमाणे लोकरे कुटुंबाने पाठपुरावा करून कुणबी दाखले काढले त्याप्रमाणे सर्व मराठा समाजाने सातत्याने प्रयत्न करून पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

                       – राजन जाधव,नेते सकल मराठा समाज

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे हे यश मिळाले असून केवळ जल्लोष न करता शासन दरबारी पाठपुरावा करून कुणबी प्रमाणपत्र मिळवावे. यासाठी सोलापुरात लवकरच कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे
                – प्रा.गणेश देशमुख,नेते सकल मराठा समाज


माझ्या पूर्वजांच्या एका नोंदीवरून 86 जनाचे कुणबी दाखले मिळाले आहेत. मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनामुळे आलेले हे यश आहे. हे दाखले या आंदोलनातील सक्रिय असणारे सकल मराठा समाजाच्या नेत्यांच्या हस्ते आमच्या कुटुंबांनी स्वीकारले.
                                             – विलास लोकरे,लाभार्थी