महिलांच्या हाती गावचा कारभार,वाडीकुरोलीत अवतरली समतेची शिकवण

महिलांच्या हाती गावचा कारभार,वाडीकुरोलीत अवतरली समतेची शिकवण

वाडीकुरोली महाराष्ट्रातील इतर गावांच्या  समोर एक आदर्श- पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते

पंढरपुर,टीम

जिच्या  हाती गावच्या कारभाराची दोरी, ती गावचा विकास करी या उक्तीप्रमाणे वाडीकुरोलीत महिलांच्या हाती सोपवलेल्या ग्रामपंचायत कारभाराचा आदर्श महाराष्ट्रातील इतर गावांच्या   समोर एक आदर्श आहे.असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले.

वाडीकुरोली ता. पंढरपूर येथे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, सहकार शिरोमणी वसंतराव (दादा) काळे यांचा ७७ वा  जयंती सोहळा व नवनिर्वाचित महिला ग्रामपंचायत उमेदवारांच्या सत्कार समारंभ प्रसंगी त्या बोलत  होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनश्री बँकेचे चेअरमन शोभाताई काळुंगे होत्या .सदर कार्यक्रमास श्रीमती मालनकाकू काळे, संगीताताई काळे ,रेश्मा पासले, जयश्री काळे,मोनिका काळे, व्यासपीठावर उपस्थित होत्या.

या प्रसंगी पुढे बोलताना सातपुते, म्हणाल्या की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या समतेची शिकवण ,आज खऱ्या अर्थाने या गावांमध्ये कल्याण काळे यांनी  सर्व महिलांना कारभाराची संधी देऊन आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे. समता कुटुंबापासून सुरू झाली पाहिजे तर महिलांची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगून त्यांनी सर्व महिला उमेदवारांचे तसेच गावकरी  यांचेही कौतुक केले.
या वेळी अध्यक्षस्थानावरुन बोलताना शोभाताई काळुंगे यांनी  सांगितले  की,ग्रामपंचायत निवडणुका  या लोकशाहीचा उत्सव असतात . संस्था या जगन्नाथाचा रथ असून  त्या सर्वांनी पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे   आणि त्यानुसार  गावाने महिलांवर  सोपवलेली जबाबदारी  त्या समर्थपणे पार पाडतील  यासाठी  ऊर्जा देणारा हा कार्यक्रम आहे . सहकार शिरोमणीचे चेअरमन ,  कल्याणराव काळे म्हणाले की, महिला याच खऱ्या अर्थाने घर कुटुंब चालवत असतात या सर्व महिला भगिनींना गावच्या कारभाराची संधी देऊन वसंतदादांनी दिलेल्या आदर्श वरून वाटचाल सुरू आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा गर्जना चे संस्थापक समाधान काळे यांनी केले. नवनिर्वाचित सदस्य सुप्रिया काळे, रेशमा पासले , सुधाकर कवडे  यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी सहकार शिरोमणी चे आजी-माजी संचालक यशवंत पतसंस्था ,प्रतिभादेवी पतसंस्था, निशिगंधा बँकेचे पदाधिकारी व आपल्या गावातील लेकी- सुनांचे कौतुक पाहण्यासाठी पुरुष मंडळी युवक मित्रांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समाधान काळे व एस. आर .कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार अर्चना काळे यांनी मानले.