श्री पांडुरंग कारखान्याच्या पुरस्कारांची झाली फिफ्टी,साखर कारखानदारीत "पांडुरंग"ने देशात मारली बाजी

श्री पांडुरंग कारखान्याच्या पुरस्कारांची झाली फिफ्टी,साखर कारखानदारीत "पांडुरंग"ने देशात मारली बाजी

 वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना हा मानाचा पुरस्कार जाहीर

श्रीपुर,टीम-------

सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस दर देण्यामध्ये नेहमीच आघाडीवर असणाऱ्या श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे देश व राज्य पातळीवरील पुरस्कारांचे अर्धशतक (फिफ्टी) पूर्ण झाली असूनदेशाच्या साखर कारखानदारीत सर्वोच्च मानला जाणारा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना हा देश गतळीवरील पुरस्कार श्रीपांडुरंग साखर कारखान्यास जाहीर झाला आहे.याबाबत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ नवीदिल्लीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांना पत्राद्वारे कळवले आहे.

सन 2020-21 च्या गळीत हंगामात सहकारी साखर कारखानदारीत देशात सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्री पांडुरंग साखर कारखान्यास हा महत्त्वपूर्ण पुरस्कार जाहीर झाला आहे . दि.16 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता नवी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे .

सहकारतपस्वी स्वर्गीय मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनानंतर कारखान्याचे अध्यक्ष आ.प्रशांत परिचारक,उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी सर्व संचालकमंडळ,खातेप्रमुख व कामगारांनी कारखाना चोखपणे चालवल्यामुळे पांडुरंग कारखान्याला हा देशातील सर्वात मोठा पुरस्कार मिळाला आहे.

श्री पांडुरंग साखर कारखान्यास आतापर्यंत राज्य व देशपातळीवरील 49 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे .आता  हा 50 वा पुरस्कार आहे . त्यामुळे या कारखान्याचे पुरस्कारांच्या बाबतीत अर्धशतक पूर्ण झाले आहे . एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि तेही राज्य व देशपातळीवरील पुरस्कार मिळवणारा पांडुरंग हा राज्यातील एकमेव कारखाना  असून कोरोनाच्या भीषण संकटात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असताना त्यावर दिलासा देण्यासाठी ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करून कोरोनाच्या महामारीत योगदान देणारा पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून पांडुरंगाचा उल्लेख  होत असल्याचे  डॉ .यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले .

या कारखान्याने आपल्या ऊस उत्पादकांना दर्जेदार ऊस उत्पादनासाठी प्रेरित करून चांगल्या प्रतीचा ऊस उपलब्ध करणे , त्याचे वेळेत गाळप करणे , तांत्रिक कार्यक्षमतेचा शंभर टक्के वापर करून साखर उतारा सर्वश्रेष्ठ ठेवून चांगल्या प्रतीच्या  साखरेचे उत्पादन घेणे आणि आपल्या ऊस उत्पादकांना उसाचा चांगला मोबदला देणे या सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन केल्याने देशातील एक आदर्श कारखाना म्हणून श्री पांडुरंग कारखान्याला नावलौकिक मिळाल्याचे आ.प्रशांत परिचारक व कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले .

या पुरस्कारामुळे पांडुरंग परिवार मध्ये मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला जात असून पुन्हा एकदा जिल्ह्याचे आ.प्रशांत परिचारक यांच्या अभ्यासू व विकसनशील नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे नक्कीच हा पुरस्कार ऊस उत्पादक सभासदांसाठी व इतर कारखान्यांसाठी एक आदर्श ठरणार असल्याचेही पहावयास मिळणार आहे.