बुलेट ट्रेन साठी जाणाऱ्या जमिनींचा दर ठरला!, 6 तालुक्यातील 784 एकर जमीन होणार भूसंपादित

बुलेट ट्रेन साठी जाणाऱ्या जमिनींचा दर ठरला!, 6 तालुक्यातील 784 एकर जमीन होणार भूसंपादित

सोलापूर,टीम------

गेल्या काही दिवसांपासून मुंबई हैदराबाद या बुलेट ट्रेन च्या मार्गाबाबत मोठे वादळ उठले आहे.सोलापूर जिल्ह्यातून जाणारी ही बुलेट ट्रेन  मराठवाड्याकडे वळविण्याचा घाट घातला जात असल्यामुळे सोलापूर करांमधून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. राजकीय नेते मंडळींनी ही बुलेट ट्रेन सोलापूर कडूनच जाईल कदापिही तिचा मार्ग बदलू दिला जाणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत  रस्त्यावर येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन सध्या चांगलीच चर्चेत आहे.

 मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन जिल्ह्यातील 6 तालुक्यातून जाणार असून तब्बल 784 एकर जमीन संपादित केली जाणार आहे.या जमिनीसाठी ग्रामीण भागाला मूल्यांकनापेक्षा पाचपट तर शहरी भागाला अडीचपट जास्त मोबदला मिळणार असल्याची माहिती जनसुनावणी दरम्यान देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई हैदराबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अनुषंगाने पर्यावरण आणि सामाजिक दृष्टीने सार्वजनिक सल्लामसलीतीसाठी  एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, आ.सुभाष देशमुख, भूसंपादन अधिकारी अरुण गायकवाड ,प्रांत अधिकारी हेमंत निकम आदी उपस्थित होते.

यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून बुलेट ट्रेन संदर्भात माहिती देण्यात आली. त्यानंतर जमीन भूसंपादन त्याचा कालावधी आदी विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. नियोजित मुंबई हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेन च्या 640 किलोमीटरच्या मार्गावर नवी मुंबई, लोणावळा,पुणे, बारामती,पंढरपूर,सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद, हैदराबाद ही स्थानके असणार आहेत. ट्रेनच्या नव्या  मार्गासाठी 17.5 मीटर रुंद जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे.या ट्रेन साठी सर्वाधिक जमीन ही पुण्यासह सोलापूर जिल्ह्यातील बाधित होणार आहे. जमिनीचा मोबदला मिळाल्याशिवाय प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे. तूर्तास कर्नाटकातील एका जिल्ह्यात जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे.

बुलेट ट्रेन संदर्भात मार्ग,स्थानके,सामाजिक व लिडारद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. आता प्रत्यक्ष काम कसे होईल,मार्ग कसा असेल, किती जमीन बाधित होईल? आदींचे  सर्वेक्षण होणार आहे. यासाठी किमान एक वर्षभराचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

ताशी 300 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या ट्रेन ने सोलापुरातील प्रवासी मुंबईला अवघ्या 3 तासांमध्ये पोहोचणार आहे. सध्या सोलापूर मुंबई हा प्रवास एक्सप्रेस ने 8 तासांचा होत असतो. सुपरफास्ट प्रवास झाल्यामुळे सोलापुरातील उद्योग क्षेत्रासह पंढरपूर व रस्त्यावरील अनेक गावांना या ट्रेनचा लाभ होणार आहे.

ही आहेत ट्रेन ची वैशिष्ट्ये----

मुंबई हैदराबाद मार्ग -649 किलोमीटर

स्थानके-सोलापूर  व पंढरपूर

प्रवासी क्षमता -750

दहा बाय दहा चे कोच

नियोजित स्पीड ताशी 300 किलोमीटर

या ट्रेन बाबतचा अंतिम अहवाल लवकर तयार होईल. हे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी भाजपच्या नेते मंडळीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. परंतु राज्यातील काही मंडळींकडून बुलेट ट्रेनचा मार्ग बदलण्याचा घाट घातला जात असल्यामुळे सध्यातरी राज्यातील महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेते असा संघर्ष सुरू झाला असल्याचे पहावयास मिळत आहे, परंतु दुसरीकडे जनसुनावणी झाली असल्यामुळे लवकरच बुलेट ट्रेन चा मार्ग मोकळा होईल व बाधित शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेल ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.