वाळू ठेकदारांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी,तब्बल 2447 ब्रास वाळूचा होणार लिलाव

वाळू ठेकदारांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी,तब्बल 2447 ब्रास वाळूचा होणार लिलाव

मंगळवेढा,टीम-----

येथील शहर व तालुक्यात अवैध वाळू उपशावर महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई करून सुमारे 2300 ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे. या वाळू साठ्याचा लिलाव दि.20 सप्टेंबर रोजी मंगळवेढा  येथील प्रांत कार्यालयात करण्यात येणार आहे. या लिलावातून सुमारे 1 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहेत.


नदी, तलाव, ओढे येथील वाळू उपसा करण्यास मनाई आहे. तरीही वाळू तस्कर रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत अवैध वाळूचा उपसा करून लाखो रुपये कमाई करीत आहेत. यामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याने महसूल व पोलीस प्रशासन अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाई करीत आहे. अशी कारवाई करून जप्त करण्यात आलेल्या सुमारे 2 हजार 300 ब्रास वाळूचा लिलाव करण्यात येणार आहे. या वाळूची शासकिय किंमत 83 लाख रुपये आहे. लिलावात भाग  घेणार्‍यांनी यावर बोली बोलायची आहे.


मंगळवेढा प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.20 सप्टेंबर रोजी लिलाव होणार आहे. यासाठी लिलावात भाग घेणार्‍या व्यक्तींनी दि.17 सप्टेंबरपर्यंत प्रांत कार्यालयात अर्ज दाखल करावयाचा आहे. जे अर्ज करतील त्यांनाच लिलावात बोलण्याचा अधिकार असणार आहे. लिलाव झाल्यानंतर वाळूची 25 टक्के रक्कम लगेच भरावयाची आहे.


सिद्धापूर येथे 610 ब्रास वाळू असून याची शासकिय किंमत 22 लाख 57 हजार रुपये, ढवळस  येथे 1500 ब्रास वाळू, किंमत 55 लाख 50 हजार, मंगळवेढा पोलीस ठाणे आवार 28 ब्रास, किंमत 1 लाख 3 हजार, सांगोला तालुका शासकिय धान्य गोदाम 130 ब्रास, किंमत 4 लाख 81 हजार, सांगोला पोलीस ठाणे आवार 17 ब्रास, किंमत 63 हजार रुपये आहे.वाळू लिलावातून शासनाच्या तिजोरीत सुमारे 1 कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

सांगोल्यातही लिलाव----

सांगोला शहर आणि तालुक्यात अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्या वाळू माफियांवर व वाळू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनांवर महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून कारवाई करत, वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये महसूल आणि सांगोला पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली वाळू सध्या शासकीय धान्य गोदाम सांगोला येथे 130 ब्रास वाळू व पोलीस स्टेशन सांगोला येथील 17 ब्रास असे एकुण 147 ब्रास वाळूची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.वाळू लिलावात सहभाग घेणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी वर नमूद ठिकाणी असणाऱ्या वाळू साठ्याची पाहणी करावी व लिलावात भाग घेण्यासाठी 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्या कार्यालयात सादर करावेत असे आवाहन  करण्यात आले आहे.