ऑक्सिजन मॅन अभिजित पाटील यांची जिल्ह्यात एन्ट्री,पंढरपूरसह सांगोला तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येणार "अच्छे दिन"

ऑक्सिजन मॅन अभिजित पाटील यांची जिल्ह्यात एन्ट्री,पंढरपूरसह सांगोला तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येणार "अच्छे दिन"

पंढरपूर,टीम-------

उस्मानाबाद, नाशिक,नांदेड या जिल्ह्यात साखर कारखान्यांची उभारणी करून तेथील उस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या व देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प राबवणाऱ्या चेअरमन अभिजीत पाटील यांच्या धाराशिव युनिटने आता सोलापूर जिल्ह्यात एन्ट्री केली असल्याचे पहावयास मिळत आहे. धाराशिव ग्रुपच्या वतीने सांगोला तालुक्यातील "शेतकरी सहकारी साखर कारखाना" भाडे तत्त्वावर सुरू करण्याचा करार झाला असून याच वर्षीच्या गळीत हंगामा पासून कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सांगोला साखर कारखान्याचे धुराडे यंदा पेटणार असून सांगोला सह विशेतहा पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार असल्याचे पहावयास मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षापासून सांगोला तालुक्यातील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा बंद आहे. मात्र गेल्या दोन वर्षात नीरा उजवा कालवा, टेंभू योजना, म्हैसाळ योजना तसेच सांगोल शाखा कालवा या सिंचन योजनांचे पाणी तालुक्याच्या चारही बाजूला फिरल्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊन कारखान्याचे चेअरमन मा.आ. दीपक साळुंखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कारखाना लवकर सुरू करण्याची विनंती केली. त्यानुसार सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, चेअरमन दीपक साळुंखे सर्व संचालक मंडळ ,धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील,राज्य सहकारी बॅंकेचे चेअरमन आनसकर, कार्यकारी संचालक देशमुख आदी मंडळी उपस्थित होती. या बैठकीत सांगोल तालुका शेतकरी साखर कारखाना धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचे सर्वानुमते ठराव मंजूर झाला. त्यानंतर चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगोल तालुका शेतकरी सहकारी कारखान्याची प्रत्यक्षात पाहणी करून याच हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्धार केला असून त्या बाबतचे कामही सुरू करण्यात आले आहे.

चेअरमन व मा.आ.दीपक साळुंखे व संचालक मंडळाच्या सहकार्याने आणि तत्परतेने गेल्या काही वर्षात कारखान्याची एकही वीट व साधा नटही देखील आम्ही जागेवरून हलू  दिला नाही म्हणूनच चेअरमन अभिजीत पाटील यांनी पाहणी केल्यानंतर कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत समाधान व्यक्त केले व तात्काळ कारखाना सुरू करण्याचा निर्धार केला आहे अशी माहिती व्हा. चेअरमन विश्वनाथ चव्हाण यांनी दिली.

गेल्या काही वर्षापासून बंद अवस्थेत असलेला हा कारखाना आपण भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला आहे. धाराशिव कारखाना प्रा. लिमिटेड हे चौथे युनिट आहे. कारखान्याचे चेअरमन दीपक साळुंखे-पाटील तसेच सर्व संचालक मंडळाच्या सहकार्यातून याच गळीत हंगामात  कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू करणार आहे.

 ---अभिजित पाटील,चेअरमन धाराशिव कारखाना युनिट 1,2,3

जिल्ह्यातील पहिली दमदार एन्ट्री---

 धाराशिव साखर कारखान्याचे हे चौथे युनिट असून जिल्ह्यातील ही पहिली दमदार एन्ट्री असल्याचे बोलले जात आहे. कामगारांची जुळवाजुळव सुरू झाली असून अधिकाऱ्यांनीही या कारखान्याला भेट देऊन कारखान्यातील सर्व यंत्रणांची पाहणी केली आहे. येत्या रविवारपासून कामाला सुरुवात होणार असून याच गळीत हंगाम ताकदीने कारखाना सुरू करण्याचा निर्धार सर्व अधिकारी व कामगारांनी घेतला आहे.त्यामुळे पंढरपूर व सांगोला तालुक्यातील उसाचा  मोठा प्रश्न मिटणार असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार असल्याचेही पहावयास मिळणार आहे.कारण चेअरमन अभिजीत पाटील यांनी जिल्ह्याबाहेरील सर्व तिन्ही कारखान्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना  उच्चांकी दर देऊन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा नक्कीच स्वाभिमान उंचावणार असून चेअरमन अभिजीत पाटील यांच्या मुळे शेतकऱ्यांना मात्र आता नक्कीच अच्छे दिन व आर्थिक दृष्ट्या मोठा ऑक्सिजन मिळणार  आहे.