त्या निर्दयी व क्रूर मातेला मनसैनिकांनी दिला चोप,शिकवला चांगलाच धडा
नागपूर,टीम---
(दि.६ जून २०२१)
'स्वामी तिन्ही जगाचा ,आई विना भिकारी' ही म्हण आजही समाजात भक्कम पणे रूढ आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका क्रूर मातेचा व्हिडिओ चांगलाच वायरल झाला होता. ही माता आपल्या लेकराला निर्दयपणे मारत असल्यामुळे समाज माध्यमांमध्ये तिच्यावर मोठी टीकेची झोड उठली होती. या क्रूर मातेचा शोध घेत तिला चांगला चोप देण्याचे काम मनसेच्या सैनिकांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओ मध्ये एक निर्दयी आई स्वत:च्या चिमुकल्याला अमानुष मारहाण करत होती. हा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट झाल्यापासून ज्यांनी ज्यांनी व्हिडीओ पाहिला त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. अखेर या क्रूर आईचा मनसेच्या नागपूर मधील महिला पदाधिकार्यांनी शोध घेऊन तिच्या घरी धडक दिली. यात महिला शहराध्यक्ष मनिषा पापडकर, सचिव स्वाती जैस्वाल, अचला मेसन यांनी या महिलेचा चांगलाच समाचार घेतला. सुरुवातीला त्या निर्दयी आईला बदडलं आणि नंतर तिची समस्या जाणून तिला मदतीचा हातही दिला. मनसेनं केलेल्या या कृत्याचं अनेकजण कौतुक करत आहेत.
सोशल मीडियावर मुलाला मारतानाचा या क्रूर मातेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती.सासुसोबत सुरू असलेल्या घरगुती वादातून या महिलेने तिच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. दरम्यान, माहिती कळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित महिलेला ताब्यात घेऊन तिच्या बाळावर औषध उपचार केले होते. तिचा पती ढोलताशा पथकात काम करतो. तिला एक सहा महिन्याचे गोंडस बाळ आहे. घरगुती वादातून तिचे सासूशी अजिबात पटत नाही. या पार्श्वभूमीवर तिचा सासु सोबत घरात वाद सुरू झाला. तेव्हा बेड मध्ये बसलेल्या या महिलेने तिच्या 6 महिन्याच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण सुरू केली. ती त्याला वारंवार गादीवर आपटत होती. या निरागस जिवाचा आकांत सुरू असताना ती त्याला गालावर, तोंडावर,पाठीवर सारखी मारत होती. हा व्हिडीओ रविवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. पीडित महिलेला आणि तिच्या बाळाला ताब्यात घेऊन डॉक्टर कडून बाळाची तपासणी करून घेतली. त्यांनतर तिच्या कडून बाळाच्या सुरक्षिततेची हमी घेऊन तिला सोडून देण्यात आले.
या क्रूर मातेने तिने आपल्या लेकराला अमानुषपणे मारहाण केल्यामुळे जनमानसात तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती, त्यामुळे मनसेने केलेल्या या कृत्याचे सर्वांकडुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.