सोलापूर जिल्ह्यात वाळू उपस्याला ग्रीन सिग्नल,2 तालुक्यातील 9 ठिकाणचे निघणार ई टेंडर, इतर ठिकाणी पाण्यामुळे प्रस्तावाला आली अडचण

सोलापूर जिल्ह्यात वाळू उपस्याला ग्रीन सिग्नल,2 तालुक्यातील 9 ठिकाणचे निघणार ई टेंडर, इतर ठिकाणी पाण्यामुळे प्रस्तावाला आली अडचण

सोलापूर,टीम----

सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून अधिकृत वाळू उपसा रखडलेला आहे.परंतु आता वाळू उपसा ठेकेदारीच्या लिलावाला शासनाने हिरवा कंदील दाखवला असल्यामुळे लवकरच जिल्ह्यातील दोन तालुक्यांमध्ये नऊ ठिकाणच्या वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू होणार आहे. पंढरपूर सह दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये नदी पात्रात पाणी असल्यामुळे  प्रस्ताव दाखल झाले नसल्याचे सांगितले जात आहे.अनेक दिवसांपासून रखडलेली वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे शासनाला महसूल मिळण्याचा मार्ग ही आता मोकळा झाला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


वाळू उपस्याला अधिकृत परवानगी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे.यामुळे वाळूला अक्षरशः सोन्याचा दर मिळाला आहे.यामुळे एका रात्रीत मालामाल होणाऱ्या या धंद्यात अनेक तरुण उतरल्याचे दिसत आहे. पोलीस प्रशासनाकडून या अवैध वाळू उपस्यावर सतत कारवाई केली जात आहे मात्र तरीही हा अवैध वाळू उपसा सुरूच आहे.


जिल्ह्यात  गेल्या तीन ते चार वर्षापासून वाळू उपसासाठीच्या ठेकेदाराची लिलाव प्रक्रिया बंद आहे. याचा परिणाम  जिल्ह्याच्या महसुलवरही झाला असून लिलाव बंद असल्याने शासनाला दरवर्षी मिळणाऱ्या 50 ते 60 कोटी रुपयांचा महसूल बुडाला होता. दुसरीकडे वाळू अभावी अनेक शासकीय निमशासकीय कामांसह गोरगरिबांच्या घरकुलांची कामे रखडली आहेत.कारण अवैध वाळू उपशामुळे वाळूला सोन्याचा दर आला आहे. वाळू चोरांवर कारवाई ही होत असते पण अनेकदा प्रांत,तहसीलदार,तलाठी व पथकाच्या अंगावर गाड्या घालून त्यांना मारण्याचे अनेक  प्रकार घडले आहेत. लिलाव नसल्यामुळे वाळूचे दर वाढले त्यामुळे बांधकामांचे दर वाढले व शासनालाही महसुलाला मुकावे लागत होते.परंतु आता लिलावास ग्रीन सिग्नल मिळाला आहे.


पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ व  दक्षिण सोलापूर या तालुक्यात वाळू  लिलाव होणार होता. परंतु दक्षिण सोलापूर व पंढरपूर मधून प्रस्ताव प्राप्त झाले नाहीत. कारण या ठिकाणी नदीपात्रात पाणी असल्याची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे मोहोळ व मंगळवेढा या तालुक्यातील 9 ठिकाणी वाळू लिलाव होणार आहेत. त्याबाबतची ई टेंडर प्रोसेस लवकरच सुरू होणार आहे. दिनांक 21 मे  पर्यंत या टेंडरची शेवटची मुदत राहणार असून 24 मे ला  टेंडरची बोली लागणार आहे व याच दिवशी दुपारी 3  वाजेनंतर टेंडर ओपन होणार असल्याचे सांगितले जात आहे. 9 ठिकाणचे एकूण 60 कोटी रुपये पर्यंतचे टेंडर असून एका घाटाची किंमत किमान 6 कोटी च्या आसपास कमी जास्त राहणार आहे.


 मंगळवेढ्यातील अर्धनारी, बठाण, मिरी सिद्धापूर,तामदरडी, आदी गावांचा समावेश या टेंडरमध्ये होणार आहे.


 शासनाच्या पर्यावरण समितीकडून 30 सप्टेंबर पर्यंत उत्खनन करण्याचे वेळ मिळाली आहे.मात्र  10 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत शासन जीआर प्रमाणे उत्खनन बंद ठेवावे लागणार आहे.


 उशिरा का होईना सोलापूर जिल्ह्यात वाळू लिलाव प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये याचे स्वागत केले जात आहे. या मुळे नक्कीच वाळूचे दर थोडे फार कमी होतील व रखडलेल्या बांधकामांनाही जोमाने सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून इतरही तालुक्यात  पाणी कमी झाल्यानंतर लवकरात लवकर वाळू उपस्याचे टेंडर काढावे अशी मागणी होत आहे.