उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती पुढे झुकले प्रशासन, पालकमंत्र्यांसोबत 7 मे रोजी सोलापुरात बैठक

उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती पुढे झुकले प्रशासन, पालकमंत्र्यांसोबत 7  मे रोजी सोलापुरात बैठक
 टेंभुर्णी,टीम-----
उजनी जलाशयातील पाच टी.एम.सी. पाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पळविले असून त्याच्या निषेधार्थ उजनी पाणी बचाव संघर्ष समितीने दि १ मे रोजी उजनी जलाशयात जलसमाधी आंदोलन पुकारले होते. सकाळी ११ वाजल्यापासून सुरू असलेले हे आंदोलन पोलिसांच्या झटापटी नंतर ही थांबले नाही. मात्र शेवटी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी दिनांक ७ मे रोजी नियोजन भवन सोलापूर येथे बैठक लावू असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलनाला स्थगिती दिली व आपल्या आंदोलनाला तुर्तास यश आल्याची भावना समितीच्या सदस्यांनी बोलून दाखविली.
      दरम्यान उजनी जलाशय परिसरात आंदोलन होणार म्हणून टेंभुर्णी पोलिसांनी उजनी गावात कडेकोट बंदोबस्त लावला होता. १ मे रोजी सकाळी ९.३० वाजताच शिवसेनेचे संजय कोकाटे यांनी उजनी जलाशयांमध्ये तळ ठोकून आंदोलनाला सुरुवात केली. सुमारे दोन तास ते उजनीच्या मधोमध जाऊन पालकमंत्र्यांचा निषेध करीत राहिले तर इकडे पोलिसांना चकवा देत शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील, जनहितचे प्रभाकर देशमुख, भाजपाचे माऊली हळणवर, जिल्हाउपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, मंगळवेढा पाणी संघर्ष समितीचे ॲड. बापू मेटकरी, नारायण गायकवाड, विठ्ठल मस्के, किरण भांगे,बळीराजाचे माऊली जवळेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी उजनी जलाशयात उड्या मारल्या व उजनीमध्ये तळ ठोकून राहिले दरम्यान आंदोलन आटोपते घ्या असे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी वारंवार विनंती करून देखील आंदोलनकर्ते ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांचा बंदोबस्त आणखीनच तगडा करत काही पोलिस पाण्यामध्ये उतरले व आंदोलनकर्त्यांना अटक करण्याच्या तयारीत असतानाच पोलीस व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये मोठी झटापट झाली व थोडी बाचाबाची देखील झाली.
 आम्हाला कोणालाही निवेदन द्यायचं नाही निवेदनाच काय होतं हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे पालकमंत्री दत्तात्रय भरणे,जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक लावा आणि तसे लेखी पत्र आम्हाला द्या तरच आम्ही पाण्यातून बाहेर निघू अन्यथा कोणत्याही परिस्थितीत आणि कसल्याही किमतीवर आम्ही पाण्याच्या बाहेर निघणार नाही असा पवित्रा उजनी पाणी बचाव संघर्ष समितीने घेतला होता.
      उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी दिनांक ७ मे रोजी नियोजन भवन सोलापूर येथे बैठक लावू असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली.
या मुळे उजनी पाणी बचाव संघर्ष समिती च्या आंदोलनासमोर प्रशासन झुकले असून हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विजय असल्याचे आंदोलन कर्ते शेतकरी नेत्यांनी सांगितले.