सोलापूर,टीम---
हैदराबाद दरम्यान प्रस्तावित असलेली हायस्पीड बुलेट ट्रेन सोलापूरवरून जाणार आहे. त्यासाठी सोलापूरात सर्व्हेक्षणाचे काम सुरू झाले. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्याअंमलबजावणीला गती मिळत आहे.
पुणे येथील मोनार्क सर्व्हेअर्स अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट या कंपनीला रेल्वेकडून सर्व्हेक्षणाचे काम देण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात एकाचवेळी दोन ठिकाणी सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी दोन पथके तयार करण्यात आली असून एक पथक सोलापूरात तर दुसरे पथक पंढरपूर येथे सर्व्हेक्षण करीत आहे.या दोन्ही पथकांकडून जीटीएस लेव्हल तपासण्याचे काम पहिल्या टप्यात होत आहे. त्यासाठी विजयपूर रस्त्यावरील रेल्वे पूलापासून विजयपूर रस्त्यावर सोरेगावच्या दिशेने सात किमी अंतरापर्यंत मोजणी करण्यात येत आहे. यानंतर जीपीएस सर्व्हेक्षण आणि ड्रोन सर्व्हेक्षण होणार आहे.
मुंबई - हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेन वांद्रे - कुर्ला कॉम्प्लेक्स, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, करकुंभ/दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी, जहिराबाद अशा स्थानकांवर थांबून हैदराबाद येथे पोहचेल असा आराखडा अंतिम होणार असल्याचे समजते.
भारत सरकारने आखलेल्या सहा नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमधील हा पाचवा कॉरिडॉर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई - हैदराबाद हे ७११ किमीचे अंतर ही बुलेट ट्रेन अवघ्या साडे तीन तासांत पार करणार आहे. सध्या सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांना हे अंतर पार करण्यासाठी ८० ते १२० किमी प्रतितास या वेगाने १४ ते १५ तास लागतात. मात्र या नव्या हायस्पीड बुलेट ट्रेनचा वेग ताशी ३२० किमीपर्यंत असल्यामुळे मुंबईतून हैदराबादला अवघ्या साडे तीन तासांत पोहचता येणार आहे.
मुंबई - हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेनसाठी सध्या सोलापूर आणि पंढरपूर येथे सर्व्हेक्षणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. एका महिन्याच्या आत हे काम पूर्ण होईल. यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.
-- किशोर सोमवंशी, अभियंता, मोनार्क सर्व्हेअर्स अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट, पुणे
*** काय आहे जीटीएस सर्व्हेक्षण ?
जीटीएस म्हणजे ग्रेट ट्रायगोनोमेट्रिकल सर्व्हेक्षण. ब्रिटिशांनी त्यांच्या अंमला खाली असलेल्या भारतीय उपखंडातील जागेचे अचूक मोजमाप करण्यासाठी ही मापनपध्दती आणली होती. त्यानुसार ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी मोजणीचे दगड लावून ठेवले होते. तीच मापे भारतीय स्वातंत्र्याच्यानंतर सुरू ठेवली गेली. आजही भारतात अनेक ठिकाणी या मापांचा वापर केला जातो. सोलापूरात सात रस्ता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातही असा दगड लावण्यात आला आहे. याच जीटीएसचा वापर करून बुलेट ट्रेनसाठी सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.या बुलेट ट्रेन मुळे नक्कीच अनेक शहरांचा विकास होण्यास मदत मिळणार आहे.कारण देवभूमी पंढरीसह अनेक ठिकाणी या गाडीला स्टॉप असणार आहे.