घराचा दरवाजा तोडून धमकावत मुलादेखत लंपास केले आईचे दागिने, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात मारला डल्ला

घराचा दरवाजा तोडून धमकावत मुलादेखत लंपास केले आईचे दागिने, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात मारला डल्ला

बार्शी,टीम------

थंडीमुळे सध्या चोर्‍या व दरोड्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे बार्शी शहरात वाणी प्लॉट येथे रविवारी पहाटे कृषी विभागातील सेवानिवृत् कर्मचाऱ्याच्या घरी चोरट्यांनी सशस्त्र दरोडा घातला . यावेळी दरवाजा तोडून धमकावत मुलादेखत वृद्ध मातेच्या अंगावरील 1.50 लाखांचे दागिने पळविल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे . या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली .मात्र चोरट्यांचा मागमूस लागू शकला नाही.

सेवानिवृत्त कृषी कर्मचारी नंदकुमार मल्लिकार्जुन कल्याणी ( वय ६० ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे .

पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार , कल्याणी यांच्या पत्नी आठ दिवसांपूर्वी पुण्यात मुलाकडे गेल्या होत्या . त्यामुळे नंदकुमार हे आईला घेऊन घरी थांबले होते . शनिवारी रात्री जेवण आटोपून दरवाजा बंद करून ते झोपले . रविवार , २ जानेवारी रोजी पहाटे चोरटे त्यांच्या घराचा दरवाजा तोडू लागले . इतक्यात त्यांची वृद्ध आई राजामती ही जागी झाली . त्यांनी मुलाला उठवून सावध केले . त्यांनी दरवाजा दाबून धरला असता , चोरट्यांनी आत जोरात ढकलून दिले . त्यानंतर चाकूचा धाक दाखवत आरडाओरडा सुरू केला . यावेळी त्यांनी दोघांनाही चाकूचा धाक दाखवून हॉलमध्ये गप्प बसविले आणि कपाट उचकटून रोख दोन हजार रुपये काढून घेतले . याबरोबरच आईच्या गळ्यातील सोन्याची माळ , अंगठी असा दीड लाखांचा ऐवज काढून घेतला . ते आरडाओरड करत असताना , भाडेकरू स्वप्नील गिराम यांना तत्काळ फोनवरून संपर्क साधला . ते खाली येईपर्यंत दागिने आणि पैसे घेऊन चोरट्यांनी तेथून पळ काढला .

 या घटनेनंतर कल्याणी यांचे भाडेकरू गिराम यांनी पोलिसांना बोलावून घेतले. पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे घटनास्थळी दाखल झाले . त्यांनी पाहणी करून तत्काळ श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञ पथकाला पाचारण केले . श्वान हे घरामागे औद्योगिक वसाहत परिसरात धावले आणि आगळगाव रस्त्यावर घुटमळत राहिले . या पथकाने ठसेतज्ज्ञांच्या मदतीने उसे घेतले आहेत. मुला देखतच जन्मदात्या आईचे दागिने चोरट्यांनी लंपास केले असल्यामुळे या घटनेने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.