बिल जमा केल्याच्या बदल्यात 3 टक्के व नवीन कामासाठी लाच मागणार मुख्याधिकारी सापडला रंगेहात जाळ्यात,जिल्ह्यातील तिसरी सर्वात मोठी घटना

बिल जमा केल्याच्या बदल्यात 3 टक्के व नवीन कामासाठी लाच मागणार मुख्याधिकारी सापडला रंगेहात जाळ्यात,जिल्ह्यातील तिसरी सर्वात मोठी घटना

माळशिरस, टीम------

सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकारी व कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकत असल्याचे पहावयास मिळत आहे. जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराने थैमान घातले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक दृष्ट्या पिळवणूक होत आहे.सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये दोन  मोठ्या कारवाया झाल्यानंतर आता माळशिरस मध्ये एक सर्वात मोठी कारवाई झाली आहे. येथील विश्वनाथ दिगंबरराव वडजे,मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय माळशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर वर्ग- २ यांचेविरुध्द १ लाख २६ हजार रुपये लाच मागणी केलेवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.या कारवाईमुळे सम्पूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

लोकसेवक वडने,मुख्याधिकारी, नगरपंचायत माळशिरस यांनी तक्रारदार यांचेकडे माऊली चौक, माळशिरस ते कचरेवाडी हद्दीपर्यंतच्या रस्ता डांबरीकरण्याचे कामाच्या बिलाचा चेक तिरूपती कन्स्ट्रक्शन यांचे बैंक खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात बिलाच्या ३ टक्के रक्कम लाच म्हणून मागीतली असल्याबाबत दि.३० सप्टेंबर रोजी तक्रारदार यांनी त्यांचा तक्रारी अर्ज अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली यांचेकडे दिला होता.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ३०.०९.२०२१, दि.२२.१०.२०२९ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक वडजे, मुख्याधिकारी,नगरपंचायत माळशिरस यांनी तक्रारदार यांचेकडे माऊली चौक,माळशिरस ते कचरेवाडी हद्दीपर्यंतच्या रस्ता डांबरीकरण्याचे कामाच्या बिलाचा चेक तिरूपती कन्स्ट्रक्शन यांचे बँक खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात १,००,०००/- रूपये व नवीन कामे मिळवून देण्यासाठी खर्च २६०००/- रूपये अशी एकूण १लाख २६,हजार रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

      दि. २२.१०.२०२१ रोजी व दि. ०१.११.२०२१ रोजी लोकसेवक वडजे, मुख्याधिकारी, नगरपंचायत माळशिरस, यांचे विरूध्द सापळा कारवाई आयोजीत केली असता लोकसेवक वडजे,मुख्याधिकारी, नगरपंचायत माळशिरस यांनी संशय आल्याने तक्रारदार यांचेकडून लाच स्विकारली नाही.

श्री. विश्वनाथ दिगंबरराव वडजे, मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय माळशिरस ता. माळशिरस जि.सोलापूर वर्ग-२ यांचे विरुध्द माळशिरस पोलीस ठाणे जि.सोलापूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.

सदरची कारवाई राजेश बनसोडे  पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, सुरज गुरव अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक, सुहास नाडगौडा अपर पोलीस उप आयुक्त/ अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे तसेच सुजय घाटगे, पोलीस उप अधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली यांचे मार्गदर्शनाखाली  गुरूदत्त मोरे पोलीस निरीक्षक, अविनाश सागर, संजय संकपाळ, अजित पाटील, प्रितम चौगुले, संजय कलगुटगी, चालक बाळासाहेब पवार, पोलीस कर्मचारी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली यांनी केली आहे.

नागरिकांना आवाहन

लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली येथे अथवा पोलीस उप अधिक्षक,लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर येथे तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ८९७५६५१२६२ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आव्हान लाचलुचपत विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात झालेली ही तिसरी सर्वात मोठी कारवाई असल्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहे. सोलापूर जिल्हा हा भ्रष्टाचाराचे एक मोठे कुरण होत असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होत आहे.