सोलापूर जिल्हा परिषदेला दुसरा बदनामीचा डाग, मुख्यकार्यकारी अधिकार्यांकडे बदलीचा प्रस्ताव सादर करण्याकरता मागितली लाच, कनिष्ठ प्रशासन अधिकारी चेळेकर महाशय सापडले जाळ्यात
सोलापूर,टीम------
गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोलापूर जिल्हा परिषद चांगलीच चर्चेत आली आहे.समाज कल्याण विभागातील "स्वामी"लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.आता पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा परिषद चर्चेत आली आहे.कारण सामान्य प्रशासन विभाग 1 मधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुहास अण्णाराव चेळेकर यांच्यावर 15 हजार रुपयांची लाच मागितल्या बद्दल मंगळवार दि.10 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की,राज्य शासनाच्या पती-पत्नी एकत्रीकरण योजनेअंतर्गत जवळच्या रिक्त शाळेवर मुख्याध्यापक म्हणून बदली करण्यासाठी एकाने अर्ज केला होता.सदर प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्याकरता सामान्य प्रशासन विभाग 1 मधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुहास अण्णाराव चेळेकर यांनी अर्जदार यांच्याकडे 25 हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 15 हजार रुपये मागितले या प्रकरणात लाचलुचपत विभागाने कारवाई करून सुहास चेळेकर यांना अटक केली आहे.
यामुळे जिल्हा परिषद प्रशासनात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून राजकीय मंडळींच्या भुवया मात्र चांगल्या उंचावल्याचे पहावयास मिळत असून बदनामीचा हा दुसरा मोठा डाग सोलापूर जिल्हा परिषद ला लागला असल्याचे सांगितले जात आहे.
सदरची कारवाई राजेश बनसोडे ,पोलीस उप आयुक्त,पोलीस अधीक्षक,लाप्रवि,पुणे,सुरज गुरव ,अप्पर पोलीस अधीक्षक,लाप्रवि,पुणे,सुहास नाडगौडा,अप्पर पोलीस अधीक्षक,पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली, संजीव पाटील ,सहा.पोलीस आयुक्त , लाप्रवि , सोलापूर पोनि. चंद्रकांत कोळी , पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार,पोना.प्रमोद पकाले,अतुल घाडगे,पोकॉ.गजानन किणगी , चापोकॉ.शाम सुरवसे यांच्या पथकाने केली आहे.
भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन संजीव पाटील सहा.पोलीस आयुक्त सोलापूर यांनी केले आहे.
जिल्हा परिषद भ्रष्टाचाराचा अड्डा बनला-साठे
येथे पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते बळीरामकाका साठे यांनी आहे.लाच घेताना रंगेहात सापडलेल्या स्वामीबाबत बोलताना विरोधी पक्ष नेते बळीराम साठे यांनी सांगितले की, या बसवराज स्वामी याला यापूर्वी दोनदा वॉर्निंग दिली होती. पूर्वीची जिल्हा परिषद आणि आत्ताची जिल्हा परिषद यात खूप मोठा फरक आहे. आत्ता पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, लोकहिताची कामे करताना जाणीवपूर्वक अडवणूक करून लाच मागितली जाते. बांधकाम विभागातही हा प्रकार अधिक दिसून येतो. गेल्या काही काळात याच विभागातील अधिकारी, कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेले आहेत. त्यात आता सोलापूर जिल्हा परिषद चर्चेत आली असल्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनीच मोठा आरोप केला आहे.