सरपंचालाच लाच मागणारा समाज कल्याणचा तो 'स्वामी' लाचलुचपत च्या जाळ्यात अडकल्यामुळे उडाली खळबळ,जिल्ह्यातील सरपंच मंडळींमध्ये कही खुशी कही मोठा गम

सरपंचालाच  लाच मागणारा समाज कल्याणचा तो 'स्वामी' लाचलुचपत च्या जाळ्यात अडकल्यामुळे उडाली खळबळ,जिल्ह्यातील सरपंच मंडळींमध्ये कही खुशी कही मोठा गम

*सोलापूर,टीम-----


 जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील  दलित वस्ती योजनेच्या कामांमुळे येथील "स्वामी"नावाचे एक महाशय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होते.हे महाशय विकास कामे मंजूर करून देण्या अगोदरच सरपंच व ग्रामसेवकांकडून आपला वाटा मागून घेत असायचे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कुजबुज लागली होती,परंतु या स्वामींचा जिप मध्ये मोठा दबदबा व अनेकांशी आर्थिक हितसंबंध,लागेबांध होते.त्यामुळे यांच्या कडे फारसे कोणी लक्ष देत नव्हते,त्याचाच गैरफायदा घेत या स्वामीने अनेक नवोदित सरपंच मंडळींना आपल्या गळाला लावले होते,जुनी सरपंच मंडळी तर होतीच.परंतु प्रत्येक कामासाठी लाच घेणारा हा स्वामी  सोमवार दि.8 नोव्हेंबर रोजी समाजकल्याण सभापतींच्या अँटी चेंबरमध्ये रंगेहात लाच घेताना सापडला आहे.त्यामुळे सरपंच व ठेकेदार  मंडळींसह जि.प.मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

 बसवेश्वर महादेव स्वामी (वय45) सहायक प्रशासन अधिकारी पशुसंवर्धन विभाग अतिरिक्त कार्यभार,कक्ष अधिकारी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई समाज कल्याण सभापती यांच्या चेंबरमध्ये झाली.


 मु.पो हिंगणी निपाणी ता.मोहोळजि.सोलापूर येथील सरपंचाने अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे यायोजने अंतर्गत विविध विकास कामांचे मंजुरीकरीता ग्रामसभेत ठराव मंजूर केला होता.त्यास अनुसरुन हिंगणी निपाणी गावातील विकासकामांचे ठरावानुसार मंजूर करण्यात आलेल्या कामांचा प्रस्ताव समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद,सोलापूर येथे सादर केला होता. सदर ग्रामपंचायतीकडून मंजुर कामांचा प्रस्ताव हा समाजकल्याण विभागकडे आल्यामुळे सरपंच याबाबत पाठपुरावा करत होते. दरम्यान यातील आरोपीने सरपंच यांचे कडे  विविध विकास कामांचे  प्रस्ताव मंजुरीकरीता दि.2 नोव्हेंबर रोजी रुपये 30 हजार लाचेची मागणी करुन सदर लाच रक्कम दि.8 नोव्हेंबर रोजी समाजकल्याण विभागाचे सभापती यांच्या कक्षामधील चैंबरमध्ये स्विकारली असता त्यास अँटी करप्शन ब्युरो अधिकाऱ्यांनी  रंगेहाथ पकडले.हीकारवाई झाल्यानंतर काही मिस्टर कारभाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या आवारातून त्वरित पळ काढला असल्याचेही बोलले जात आहे.


सदरची कारवाई राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक पुणे,सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक पुणे,सुहास गाडगौडा अप्पर पोलीस अधीक्षक पुणे,यांच्या मार्गदर्शनाखाली संजीव पाटील पोलीस उपअधीक्षक सोलापूर यांच्या सह उमाकांत महाडिक,चंद्रकांत कोळीपोलीसनिरीक्षक,पोनाकोष्टी,पोशीजानराव,पवार,सनक्के,किनगी,चापोशे सुरवसे यांच्या पथकाने केली आहे.

 बसवेश्वर स्वामी हे मागील अनेक वर्षापासून समाज कल्याण विभागातील दलित वस्ती सुधार योजना या टेबलचे काम पाहत आहेत, त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या शेवटी सोमवारी लाच घेताना त्यांना पकडण्यात आले .लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याचे समजतात संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली असून सरपंच मंडळींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.कारण विकास कामे मंजूर होण्यासाठी अनेकांनी अगोदरच स्वामी यांना मोठा "मलिदा" दिला असल्याचे बोलले जात आहे.या मध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील सरपंच मंडळींसह काही ठेकेदार मंडळींचाही समावेश असून यासर्वात पंढरपूर आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.