बनावट सोने प्रकरणाला वेगळे वळण, दिल्ली पर्यंत केले कनेक्शन

बनावट सोने प्रकरणाला वेगळे वळण, दिल्ली पर्यंत केले कनेक्शन

बनावट सोने प्रकरणाला वेगळे वळण, दिल्ली पर्यंत केले कनेक्शन

पाचआरोपींना अटक,तीन फरार

मोहोळ,टीम---
आर्थिक गरज असल्याचे दाखवून २२ कॅरेट च्या हॉलमार्क असलेल्या बनावट सोन्याच्या चैन गहाण ठेऊन कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील अन्य दोघांना मोहोळ पोलिसांच्या पथकाने कोल्हापूर व सांगली येथून अटक केली असून त्यामुळे या बनावट चैन गहाण ठेवून फसवणूक प्रकरणातील अटक आरोपींची संख्या ५ झाली आहे.तर अन्य तीन जण फरार आहेत. बनावट चैन प्रकरणाचे कनेक्शन आता सावळेश्वर च्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचले असून यामध्ये नवनवीन माहिती पोलिसांसमोर येत आहे.

           या प्रकरणात मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील गंगा ज्वेलर्सचे मालक मारुती रेवणकर यांना गावातीलच दावल तांबोळी याने बनावट सोन्याच्या चैन देऊन ६ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुन्हा  सोन्याची चैन गहाण ठेवण्यासाठी आलेल्या इस्माईल इन्नुस मणियार याला मोहोळ पोलीसांनी ताब्यात घेऊन  त्याच्याविरोधात २६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने या चैन आटपाडी तालुक्यातील पिसेवाडीचा मनोज मधुकर बनगर देत असल्याचे तपासात सांगितले. त्यानुसार मोहोळ पोलिसांनी आटपाडी येथे जाऊन मनोज बनगर याला अटक करून चौकशी केली असता या सर्व सोन्याच्या चैन दिल्लीतुन कुरिअरद्वारे होलमार्क टाकून पुण्यातून सावळेश्वर येथे आणून सावळेश्वर मधून जिल्हाभर एजंट मार्फत सोनाराकडे व काही बँकाकडे  गहाण ठेवल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर माढा तालुक्यातील भुताष्टे येथून एजंट बळीराम महादेव यादव यालाही अटक केली होती. यादव व बनगर यांच्याकडे चौकशी केल्यानंतर बनगर याने या बनावट सोन्याच्या चैन आणण्याचा संबंध सांगली येथील सराफ व दिल्लीच्या एजंटाशी संपर्क करणाऱ्या योगेश श्रीगुरेलाल शर्मा याचे नाव सांगितले. त्यानुसार दि. २९ रोजी मनोज बनगर याचा दुसरा साथीदार नवनाथ किसन सरगर रा.करगणी ता.    आटपाडी व योगेश शर्मा सराफ कट्टा सांगली या दोघांना पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे व पो. कॉ. प्रवीण साठे यांच्या पथकाने सांगली येथे जाऊन सोन्याच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. योगेश शर्मा व नवनाथ सरगर या दोघांना मोहोळच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २२ कॅरेट ९१६ व A SSJ असा लोगो असलेल्या बनावट सोन्याच्या चैन पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणांमध्ये आणखी कोण कोण सामील आहे? अशाच पद्धतीने आणखी कोण कोणत्या शहरांमध्ये बँका, पतसंस्था तसेच सोनारांकडे या टोळीने सोन्याच्या चैन गहाण ठेवल्याच्या तपासाचे आव्हान मोहोळ पोलिसांसमोर आहे.

इस्माईल युनूस मणियार रा. सावळेश्वर ता. मोहोळ, मनोज मधुकर बनगर पिसेवाडी ता. आटपाडी, बळीराम महादेव यादव रा. भुताष्टे ता. माढा, नवनाथ किसन सरगर रा. करगणी ता. आटपाडी व योगेश गुरेलाल शर्मा रा. सराफ कट्टा सांगली अशा पाच जणांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली असून बबलू उर्फ इसाक पठाण, सद्दाम उर्फ बबलू तांबोळी व दावल उर्फ पप्पू तांबोळी तिघेही रा. सावळेश्वर ता मोहोळ हे फरार आहेत.

** बनावट सोन्याच्या चैन वर होलमार्क लावून खाजगी बँका, पतसंस्था व सोनारांना फ़सवणाऱ्या टोळीने सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर अनेक जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीने अनेकांना फसवल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. बनावट चैन वर होलमार्क लावून पाठविणाऱ्या एजंटचे धागेदोरे पोलिसांना मिळाले असून दिल्ली येथील सूत्रधाराला ताब्यात घेण्यासाठी मोहोळ पोलिसांचे पथक प्रयत्न करत आहे.