चक्क दुधात "लीना नीळ" चा वापर, गायीच्या दुधाला आला म्हशीच्या दुधाचा पांढरा रंग,सांगोल्यात दूध भेसळीचा अनोखा कारनामा

चक्क दुधात "लीना नीळ" चा वापर, गायीच्या दुधाला आला म्हशीच्या दुधाचा पांढरा  रंग,सांगोल्यात दूध भेसळीचा अनोखा कारनामा

सांगोला, टीम------

कमी दिवसात मालामाल होण्यासाठी अनेक क्लुप्त्या वापरल्या जात असतात. दुधात भेसळ करुन सर्वसामान्य जनतेला उल्लू बनवत त्यांच्या जीवावर एका रात्रीत मालामाल होण्याचा गोरखधंदा अनेक ठिकाणी होत असल्याचे पहावयास मिळत आहे. अशाच एका भेसळयुक्त दुधाच्या धंद्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने छापा टाकून उघडकीस आणला आहे. गाईच्या दुधाचा रंग बदलण्यासाठी गाईच्या दुधाला म्हशीच्या दुधाचा रंग येण्यासाठी चक्क दुधामध्ये "लीना नीळ" चा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.यामुळे मानवी शरीरास उपयोगी व गरजेचे असणारे दूध हे किती धोकादायक असू शकते याचा अंदाज बांधणीही आता अवघड झाले आहे.

या बाबत ची माहिती अशी की,दि.23 ऑक्टोंबर रोजी दूध भेसळीच्या संदर्भात मिळालेल्या माहितीवरून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत दक्षता विभाग मुंबई, अन्न व औषध प्रशासन सोलापूर व इतर अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या समवेत मु. पो- देवळे ता- सांगोला, जि- सोलापूर येथील रणजित शिवाजी व्हनमाने (भागीदार) यांच्या मालकिच्या मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स, अलदार वस्ती,मु.पो- देवळे ता- सांगोला जि- सोलापूर या पेढीवर धाड टाकून तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या.

पेढीमध्ये दुध भेसळीकरीता लिना निळ (अपमिश्रक) या कंपनीच्या 500ml चे 10 सील बंद बॉटल आढळून आल्या. तसेच सदर पेढीच्या बाजूला असलेल्या युवराज भगवान अलदार (भागीदार) यांच्या घराची तपासणी केली असता त्याठिकाणी एका खोलीमध्ये व्हे पावडर (अपमिश्रक) अमूल ब्रॅण्ड चे 25 kg चे 3 बॅग आढळून आल्या. सदर ठिकाणी लिना निळ (अपमिश्रक) बाबत रणजित शिवाजी व्हनमाने (भागीदार) यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर निळ ही गाय दूधामध्ये टाकून गायीच्या दुधास म्हशीच्या दुधासारखा पांढरा रंग करण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले.यावरुन मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स  या पेढीमार्फत भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. 

 सदर ठिकाणाहून गाय दुध या अन्न पदार्थाचे तसेच व्हे पावडर व लिना निळ या अपमिश्रकाचे नमुने विश्लेषणास घेऊन उर्वरित 1.गाय दूध 298 ली.- किंमत 8046/- 2.व्हे पावडर- (अपमिश्रक) 74 kg किंमत-12074/- 3.निळ (अपमिश्रक) (लीना) -6 बॉटल - किंमत 540/- असे एकूण - 20,660/- चा साठा जप्त करण्यात आलेला आहे. जप्त करण्यात आलेले रासायनिक केमिकल्सचा वापर करुन तयार केलेल्या गाय दूधाचा सुमारे 298 लिटरचा साठा नष्ट करण्यात आला. त्यानंतर सदर पेढीस तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देऊन मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स, अलदार वस्ती,मु.पो- देवळे ता- सांगोला जि- सोलापूर या पेढीस मंजुर असलेला अन्न परवाना रद्द करण्यात आलेला आहे. 

या प्रकरणी मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स या पेढीचे भागीदार रणजित शिवाजी व्हनमाने व इतर 5 भागीदार तसेच सदर पेढीकडून भेसळयुक्त दुध स्विकारुन भेसळीस हातभार लावणारी पेढी चैतन्य संकलन केंद्र,पंढरपूर, तसेच व्हे पावडर (अपमिश्रक) पुरवठा करणारी पेढी  श्री बालाजी ट्रेडर्स,जयसिंगपूर ता - शिरोळ जि- कोल्हापूर यांच्याविरुद्ध भा.दं.वि कलम 34, 272, 273, 420 व अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत  सांगोला पोलीस स्टेशन, सांगोला येथे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. तसेच विक्रेता पेढी मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स तसेच पेढीचे भागीदार रणजित शिवाजी व्हनमाने व इतर 5 भागीदार तसेच भेसळयुक्त दुध स्विकारुन भेसळीस हातभार लावणारी पेढी मे. चैतन्य संकलन केंद्र,पंढरपूर, तसेच व्हे पावडर (अपमिश्रक) पुरवठा करणारी पेढी मे. श्री बालाजी ट्रेडर्स,जयसिंगपूर ता - शिरोळ जि- कोल्हापूर  यांनी दुधात भेसळीसाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या निळ या रासायनिक पदार्थाचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द अतिरिक्त भा. दं. वि. कलम 328 व अन्न सुरक्षा मानदे कायद्याचे कलम 38(6) व कलम 59 नुसार फिर्याद देण्यात आलेली आहे.


सदरची कारवाई आयुक्त  परिमल सिंग, व पुणे विभागाचे सह आयुक्त,शिवाजी देसाई, तसेच प्रदिपकुमार राऊत, सहाय्यक आयुक्त (अन्न ), सोलापूर यांच्या मार्गदर्शन खाली अन्न व औषध प्रशासनातील दक्षता विभाग सर्व ज्ञानेश्वर महाले, अन्न सुरक्षा अधिकारी, अरविंद खडके,राम मुंडे,मिलिंद महागंडे, अन्न सुरक्षा अधिकारी, सातारा कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार, रोहन शहा, कोल्हापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे, महेश मासाळ, गणेश कदम व सोलापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी  भारत भोसले, उमेश भुसे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण दुधात चक्क पांढऱ्या कपड्यांना चकाकी आणणाऱ्या व पांढऱ्या कपड्यांची शोभा वाढवणार्‍या "लीना निळ" चा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे जीवन आवश्यक असणारे दूध नेमके येथून  पुढे प्यावे का याबाबत ही भीती निर्माण झाली आहे.