टेंभुर्णीमध्ये भरदिवसा फ्लॅटमध्ये चोरट्यांनी मारला डल्ला, ४ लाख ६५ हजारांचा ऐवज केला लंपास   

टेंभुर्णीमध्ये भरदिवसा फ्लॅटमध्ये चोरट्यांनी मारला डल्ला, ४ लाख ६५ हजारांचा  ऐवज केला लंपास   
टेंभुर्णी,टीम-----
 येथील प्रसिद्ध कापड व्यापारी वीरकुमार शहा यांच्या टेंभुर्णी- कुर्डूवाडी रस्त्यावरील ऋषभ बिल्डींग मधील फ्लॅटच्या दरवाज्याचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी  तोडून आतमध्ये प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकाटून त्यामधील ४ लाख ६५ हजार रूपये किंमतीचे सुमारे 15  तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना बुधवारी  सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून या बाबतचा  गुन्हा दाखल झाला आहे. भर दिवसा घरफोडी ची मोठीच घटना घडल्याने  शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी,  येथील कापड व्यापारी वीरकुमार शहा ( वय- ६६) यांचे येथील टिळक रोड येथे रचना साडी सेंटर नावाचे कापड दुकान आहे. टेंभुर्णी- कुर्डूवाडी रस्त्यावर ऋषभ बिल्डींग मधील फ्लॅटमध्ये पत्नी तनुजा, मुलगी समृध्दी सह राहतात. 14 दिवसापूर्वी वीरकुमार शहा  त्यांच्या मोठ्या मुलीचे अल्पशः आजाराने निधन झाल्याने गेल्या चार दिवसापासून त्यांचे लहान भाऊ संजय शहा यांच्याकडे राहण्यास गेले होते. वीरकुमार शहा हे दररोज सकाळी त्यांच्या फ्लॅटवर जाऊन येत होते. बुधवारी सकाळी  दहा वाजता वीरकुमार शहा व त्यांची पत्नी तनुजा हे दोघे कपडे आणण्यासाठी फ्लॅटवर गेले होते. साडे दहा वाजता कपडे घेऊन परत भावाच्या घरी आले. नंतर सायंकाळी सहा वाजता ते दोघे राहिलेले आणखी कपडे आणण्यासाठी फ्लॅटवर आले असता फ्लॅटच्या दरवाज्याचे कुलूप तोडल्याचे त्यांना दिसले. दार उघडे असल्याने घरामध्ये जाऊन पाहिले असता बेडरूममधील लाकडी कपाटाचे ड्रावर बाहेर ओढल्याचे तसेच त्यामधील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले.

लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकाटून त्यामधील १ लाख ५० हजार रूपये किंमतीच्या  पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन पाटल्या, ६० हजार रुपये किंमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे  नेकलेस, ७५ हजार रुपये किंमतीची  अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन, ४५ हजार रुपये किंमतीची दिड तोळे वजनाची सोन्याची चेन, ३० हजार रूपये किंमतीचे एक तोळा वजनाचे सोन्याचे  मंगळसुत्र, ३० हजार रुपये किंमतीच्या एक तोळे वजनाच्या चार सोन्याच्या लहान अंगठ्या, २४ हजार रुपये किंमतीची सोन्याची कर्णफुले, ९ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे वेल, १५ हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील डायमंडची रिंग, १२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे कानातले असा एकूण ४ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.
उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.विशाल हिरे व  प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना बोलावण्यात आले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शितोळे हे करीत आहेत.