फेसबुक वर पाहिली पोस्ट, ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीचा नाद आला अंगलट,2.50 लाखांची बसली टोपी

फेसबुक वर पाहिली पोस्ट, ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीचा नाद आला अंगलट,2.50 लाखांची बसली टोपी

कुर्डवाडी,टीम-----

सध्या सोशल मीडिया हे एक नवीन प्रभावी माध्यम ठरत आहे. परंतु या सोशल मीडियाचा अनेक ठिकाणी गैरवापर होत असून अनेक नागरिकांची मोठी फसवाफसवी  या सोशल मीडियामुळे होत आहे. फेसबुक,व्हाट्सअप वर असलेल्या ग्रुप मधून अनेकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार पुढे येत आहे. फेसबुक वर ट्रॅक्टर ट्रॉली ची एक पोस्ट पाहिली आणि त्या पोस्ट च्या नादी लागून एका जणांची चक्क अडीच लाख रुपयांना फसवणूक झाली आहे.

 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अरविंद बुकन यांना शेती व्यवसाय साठी ट्रॅक्टर ट्रॉली पाहिजे होती. त्यांनी फेसबुक वरील ट्रॅक्टर खरेदी विक्री सोलापूर या ग्रुप वर काही फोटो पाहिले. त्यानंतर ग्रुप वर असलेल्या मोबाईल नंबर वर दि.24 जून रोजी फोन करून दोन ट्रॉल्या खरेदी करण्याची विचारपूस केली. तेव्हा सदर फोन नंबर वरील व्यक्तीने किमतीचे नंतर बघू येताना अडीच लाख रुपये घेऊन या असे सांगितले. बुकन यांनी कुठे यायचे आहे असे विचारले असता कुर्डवाडी च्या पुढे चार किलोमीटर वर कुर्डू गावातील असे त्यांना सांगितले.  त्यानंतर बुकन  यांनी ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी करण्यासाठी आल्याचे सांगितले. व त्यांचा मित्र सौरभ महादेव जाधव, ड्रायव्हर कुमार बोरे हे कुर्डू येथे पोहोचले. त्यावेळी त्यांना चौकातील एका हॉटेलवर येण्यास सांगितले.

कोयल शिंदे व त्याच्या सोबत असलेल्या  महेश शिंदे याने बुकन यांना  पेमेंट आणले आहे का? असे विचारले असता बुकन यांनी दोन- अडीच लाख रुपये आमच्याकडे आहेत असे सांगितले. परंतु सध्या ट्रॉल्या संपल्या आहेत, आल्या की तुम्हाला कळवतो असे फेसबुक वरील त्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर आम्ही जातो. आल्यावर आमच्या शी संपर्क करा असे सांगून बुकन यांनी आपल्या घरचा रस्ता धरला. परंतु काही अंतरावर गेल्यावर कुर्डू रस्त्यावरील एका मंगल कार्यालय समोर सायंकाळी साडेचारच्या सुमारास आईस्क्रीम  खाण्यासाठी थांबले. तेव्हा पाठीमागून कुर्डु येथे भेटलेल्या दोन व्यक्ती व इतर काही महिलांनी दगड घेऊन त्यांना आडवून  त्यांच्यावर हल्लाबोल केला. पैसे द्या अन्यथा तुम्हाला मारहाण करू  असे म्हणत जबरदस्तीने गाडीत  ठेवलेले पैसे काढून घेतले.व नंतर कोयल शिंदे याने ज्योती पळ...पळ  असे म्हणत दुचाकीवरुन पोबारा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे हे करीत आहेत.

 मात्र ही  फेसबुक पोस्ट एकाला चांगलीच महागात पडली असून नागरिकांनी फेसबुक, व्हाट्सअप वर असलेल्या पोस्ट पाहून सावधान व्हावे. कुठल्याही प्रकारचे व्यवहार करू नये,व्यवहार करताना खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या बाबत अरविंद पुरुषोत्तम बुकन रा.बुकनवाडी उस्मानाबाद यांनी कोयल शिंदे याच्या विरोधात कुर्डवाडी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.