सुस्ते येथे दरोडा,एक लाख रुपयांचा ऐवज लंपास,गावातील 5 ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न,ग्रामस्थ भयभीत

सुस्ते येथे दरोडा,एक लाख रुपयांचा ऐवज लंपास,गावातील 5 ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न,ग्रामस्थ भयभीत

तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
सुस्ते,टीम------
(दि.१०जून२०२१)
येथील निलेश भीमराव भोसले यांच्या घरावर बुधवारी पहाटे सव्वा दोन वाजण्यास सुमारास चोरट्यांनी दरोडा टाकून एक लाख रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.एकाच रात्री या गावातील पाच घरांवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याने या परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
            
            खिडकीतून हात घालुन स्टेफनीने दरवाजाची कडी उघडून चार चोरट्यांनी भोसले यांच्या घरात प्रवेश केला. घरामध्ये निलेश भोसले त्यांच्या पत्नी शितल व दोन मुलं गाढ झोपीमध्ये होते.घरातील लाईट बंद करून चोरट्यांनी बेडवर झोपलेल्या निलेश भोसले व त्यांच्या पत्नी शितल यांचे सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल हिसकावून घेतले.त्यानंतर तोंडावर बॅटरीचा प्रकाश मारून निलेशच्या गळ्याला चाकु लावुन पैशाची व दागिण्याची मागणी केली.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे भयभीत झालेल्या निलेशच्या पत्नीने आपल्या  कानातील सोन्याचे पाच ग्रॅमचे झुबे व दहा ग्रॅम मणी मंगळसुत्र चोरट्यांना काढून दिले.त्यानंतर स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने कपाटाचे लाॅक तोडले.मात्र हाती काही लागले नसल्याने घरातील चांदीची वाटी व गणेश मूर्ती असा एकुण एक लाख रूपयांचा ऐवज घेऊन घराला बाहेरून कडी लावुन चोरटे पसार झाले.हे चोर 35 ते 40 वयोगटातील असल्याचे भोसले यांनी सांगितले.तर एकूण सहा चोर असल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे.

           याच चोरट्यांनी गावातील कुंदाबाई पवार यांच्या घराचे कुलुप तोडून मिक्सर व कुऱ्हाड लंपास केली आहे.तर यशवंत पवार,संजय पाटील यांच्याही घरांवर तर दत्तात्रय लोकरे यांच्या दुकानांवर व अभिजीत घाडगे यांच्या अमृता पाणी जलवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता.मात्र प्रत्येक ठिकाणच्या व्यक्तींना जाग आल्याने व कुत्र्यांच्या आवाजाने चोरट्यांनी धुम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.तालुका पोलिस निरीक्षक किरण अवचर,सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.के ओलेकेर यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त गावामध्ये तैनात करण्यात आला होता. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वानपथक फिरवण्यात आले.विशेष म्हणजे पहाटे दिड ते चार वाजेपर्यंत हे चोरटे दरोडा टाकण्याचा प्रयत्न करीत होते.

     चोरीचा प्रयत्न केलेल्या पाच ठिकाणच्या घटनास्थळांचा पंचनामाही करण्यात आला आहे.या घटनेची नोंद तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात निलेश भोसले यांनी गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन वसमळे करीत आहेत.