रेशनच्या तांदूळ विक्रीत काळाबाजार,मोहोळ पोलिसांनी पकडला ट्रक,400 पिशव्यांसह 2 जण ताब्यात
मोहोळ,टीम-------
कोरोना व लॉकडाउन मुळे परेशान झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोफत अथवा कमी दरात रेशनचा माल देवून ठाकरे सरकार दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र याच मालावर डल्ला मारण्याचे काम काही जणांकडून होत आहे.कारण मोहोळ मध्ये रेशनचा तांदूळ भरलेला मालट्रक विक्रीसाठी जात असताना पोलिसांनी पकडला असून तब्बल 400 पिशव्यांसह 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या बाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहीतीनसार रेशनच्या तांदळाने भरलेला मालट्रक सोलापूर हुन निघाला असल्याची खबर मोहोळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार मोहोळ पोलिसांनी, पोलिस निरिक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राजकुमार डुणगे, पोहेकॉ मुन्ना बाबर, घोळवे, निलेश देशमुख यांच्या पथकाने सावळेश्वर टोल नाक्याच्या जवळ, तुळजाई हॉटेलजवळ सापळा लावला. MH12 EF 1374 या क्रमाकांचा मालट्रक येताच बाजूला घेवून ड्राव्हरकडे चौकशी केली असता त्याच्या माहितीमध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे पोलिसांचा संशय आधिकच बळावला त्यामुळे मोहोळ पोलिसांनी सदरचा ट्रक मोहोळ पोलिस ठाण्यात आणून लावला. व त्याची तपासणी केली यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे तांदळांनी भरलेल्या ४०० पिशव्या (अंदाजे ४ लाख २९ हजार ) असे आढळून आले. यातील ड्रायव्हर हरिहासदास नारायण माळी, क्लीनर महेश फडतरे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांना संशय आल्याने या गाडीमधील तांदळाची शहानिशा करण्याकरिता वाहनचालक हरिदास नारायण माळी व क्लिनर महेश हणुमंत फडतरे (दोघे रा. तुगंत ता. पंढरपूर या दोघांना ताब्यात घेतले. सदरचा माल हा सोलापूर येथील दयानंद कॉलेजच्या पाठीमागील गोडावूनमध्ये कलबुर्गी ट्रेडर्स जनरल मॅर्चंट अॅण्ड कमिशन एजंट, सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर येथे भरल्याचे निष्णन्न झाले आहे.
सदरचा तांदूळ हा रेशनचाच असून, ५० किलोच्या दुसऱ्या पोत्यामध्ये भरून विक्रीसाठी कलबुर्गे ट्रेडर्सच्या मालकाच्या सांगण्याप्रमाणे व दिलेल्या पावतीप्रमाणे घेऊन जात असल्याचे चालक हरिदास माळी याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.
या वाहनामध्ये असलेल्या ४०० कट्ट्यातील तांदूळ स्वस्त धान्य दुकानातील असल्याचे व लोकांकडून कमी दराने घेऊन ते काळ्या बाजारात विक्रीकरता नेत असल्याबद्दल पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे सदर तांदळाची पुरवठा विभागामार्फत तपासणी करण्याचे पत्र महसूल विभागाला देण्यात आले आहे. तातडीने पुरवठा निरीक्षक संदीप गायकवाड यांनी गाडीतील तांदळाचे नमुने सोलापूर व पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवून दिले आहेत. तो अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी सांगितले.
या कारवाई मुळे रेशन दुकान दारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून या अगोदर असा किती माल लंपास केला आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.