मुलीच्या लग्नासाठी उच्चशिक्षित डॉक्टर बापाने तयार केली बनावट कागदपत्रे, शासनाला घातली 6 लाख 50 हजार रुपयांची टोपी, गुन्हा दाखल

मुलीच्या लग्नासाठी उच्चशिक्षित डॉक्टर बापाने तयार केली बनावट कागदपत्रे, शासनाला घातली 6 लाख 50 हजार रुपयांची टोपी, गुन्हा  दाखल

बार्शी,टीम----

आजकालच्या वाढत्या महागाईमुळे मुलीचे लग्न करणे बापासाठी मोठे आर्थिक खर्चाची बाब मानली जात आहे. समाजामध्ये हुंडा घेण्यावर बंदी आली असतानाही मात्र हुंड्याच्या नवनवीन पद्धती समाजामध्ये आल्या आहेत. त्यामुळे  आपली प्रतिष्ठा व अब्रू वाचवण्यासाठी मुलीच्या बापाला भरमसाठ खर्च करून आपल्या लेकीचे हात पिवळे करून द्यावे लागत आहेत. यामुळेच स्वतःच्या मुलीच्या विवाहासाठी बार्शी येथील अधिकारी असलेल्या एका डॉक्टर बापाने  चक्क भविष्य निधीतील  पैसे काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची बनावट कागदपत्रे तयार करन  6  लाख 50 हजार रुपयांची शासनाची फसवणूक केल्याची  बाब उघडकीस आली असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, डॉ. तानाजी शिवाजी खांडेकर सहा. आयुक्त तालुका लघु वैद्यकीय चिकित्सालय बार्शी यांना मुलीच्या विवाहासाठी पैशाची अत्यंत गरज होती. त्यामुळे 18 मार्च 2021 रोजी त्यांनी प्रस्ताव सादर केला, प्रस्तावाचा पाठपुरावा केल्यानंतर आदेश प्राप्त झाला होता परंतु तो चुकीचा असल्याने पुन्हा 16 एप्रिल रोजी प्रस्ताव सादर केला, पण कोरोनामुळे प्रस्ताव पुणे येथे घेऊन जाणे शक्य नसल्याने वरिष्ठ कार्यालयाचे बनावट मंजुरी आदेश पत्र दि. 22 एप्रिल 2021 रोजी चा जावक क्रमांक, सही करून 26 एप्रिल 2021 रोजी मंजुरीसाठी उपकोष कोषागार अधिकारी बार्शी येथे सादर केले. याप्रकरणी संपूर्ण चौकशीअंती प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त पुणे यांना अहवाल देण्यात आला.

डॉ.खांडेकर यांनी बनावट दस्तऐवज च्या आधारे अहवाल तयार करून भविष्य निर्वाह निधी देयक कोषागारातुन पारित केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शासनाची दिशाभूल बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे आदेश पशुसंवर्धन आयुक्त पुणे यांनी दिले त्यामुळे डॉ.खांडेकर यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 420, 465,471 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त ,सोलापूर डॉ.नाना अर्जुन सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त पुणे कार्यालयाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी उपकोषागार अधिकाऱ्यांना सूचना करून देयके रोखण्याची कारवाई करावी, असे मेल द्वारे तात्काळ प्रक्रिया करून 27 एप्रिल 2021 रोजी सांगत सर्व देयके ताब्यात घेतली आहेत.डॉ. खांडेकर यांची चौकशी केली असता त्यांनी लेखी जबाबात मुलीच्या लग्नासाठी पैशाची गरज असल्यामुळे हा प्रकार केल्याचे सांगितले आहे.