कोरोना बाधित महिलेचा जबाब घेणे झाले जीवघेणे,आशावर्कर वर भ्याड हल्ला, घरच्यांनाही केली शिवीगाळ

कोरोना बाधित महिलेचा जबाब घेणे झाले जीवघेणे,आशावर्कर वर भ्याड हल्ला, घरच्यांनाही केली शिवीगाळ

माढा,टीम-----

कोरोणाच्या महामारी मध्ये रुग्ण व आरोग्यसेवा यांच्यामध्ये महत्त्वाचा दुवा बनण्याचे काम आशा स्वयंसेविका करीत आहेत.अत्यंत तुटपुंज्या मानधनावर ही ग्रामीण भागात लाखमोलाचे  काम करून, कोरोनाला  अटकाव करण्यासाठी त्या महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. परंतु कोरोनाच्या काळात मोठी जबाबदारी पार पाडणाऱ्या आशा स्वयंसेविका यांच्या वर वारंवार हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार कव्हे  ता. माढा येथे घडला असून  येथील आशा वर्कर शोभा प्रवीण मेहता(वय 35) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात शोभा मेहता या जखमी झाल्या आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शोभा मेहता या  गावात सन 2010 पासून आशा वर्कर म्हणून काम करत आहेत. याच गावातील एका महिलेचा 14 मे रोजी कोरोना अहवाल हा पॉझिटिव आला होता. त्यावेळी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तिला कुर्डूवाडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यास आशा वर्कर ला सांगण्यात आले. संबंधित  आशावर्कर त्या महिलेच्या घरी गेल्या असता, त्यांनी विलगीकरणला विरोध केला व  विलगीकरनात न राहता  घरीच राहते अशी भूमिका घेतली. बाधित महिला  आपल्या घरी थांबल्याबाबतचा जबाब सरकारी डॉक्टरांनी घेण्यास सांगितले, त्यामुळे पुन्हा आशा वर्कर 21 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता तिच्या घरी पोहोचल्या परंतु संबंधित बाधित महिला घरी नसल्याचे दिसून आले.यामुुुळे आशा   वर्कर यांनी  तिथे उपस्थित असणार्‍या तिच्या मुलीचा जबाब नोंदवून घेतला. याचा मनात राग धरून बाधित महिलेच्या पतीने सायंकाळी घरी आल्यानंतर आशा वर्कर च्या घरी जाऊन तिच्या व तिच्या घरच्यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

याबाबत सुधीर रंगनाथ चोपडे राहणार कव्हे ता. माढा याच्याविरुद्ध कुर्डूवाडी पोलिसात गुन्हा दाखल केला असून याघटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जाधव हे करीत आहेत.

या घटनेमुळे तुटपुंज्या मानधनावर कोरोनाच्या महामारीतही  कोणतेही सुरक्षाकवच नसताना डोक्यावर कारवाईचा धाक घेऊन या सर्व आशा वर्कर प्रामाणिकपणे काम करत आहेत,त्यामुळे जिल्ह्यातील आशा वर्कर मध्ये मोठी भीती निर्माण झाली असून कोरोनाचे काम करतांना निदान पोलीस  संरक्षण देण्याची मागणी त्यांच्याकडून आता केली जात आहे.