पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील 4  द्राक्ष बागायतदारांना व्यापाऱ्याने घातली टोपी,11 लाखांचा माल केला लंपास

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील 4  द्राक्ष बागायतदारांना व्यापाऱ्याने घातली टोपी,11 लाखांचा माल केला लंपास

पंढरपूर,टीम-----

लॉकडाउन च्या सावटामुळे शेतीमालाचे दर गडगडले आहेत त्यामुळे मोठ्या कष्टाने जीवापाड जपलेला शेतीमाल ,कवडीमोल दराने देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. परंतु या  परिस्थितीतही  शेतकऱ्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांनाच टोपी घालण्याचे काम पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे झाले आहे. येथील  4 शेतकऱ्यांचा 11 लाख 37 हजार रुपयांचा 17 हजार  931  किलो द्राक्षे व्यापाऱ्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे द्राक्ष बागातदार शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.

 याबाबतची अधिक माहिती अशी की,कासेगाव ता.पंढरपूर येथील  अर्जुन यशवंत जाधव (वय 35) राहणार कासेगाव, आप्पा देशमुख,निजाम जमादार, अक्षय देशमुख या शेतकऱ्यांनी आपला माल व्यापारी हेमंत दिलीप चव्हाण, मोहम्मद असरफ मोहम्मद सलमान दोघे रा. पंचशील ए /5 कृष्णा टाऊनशिप अंबती मार्ग, वसई ठाणे यांना दिला परंतु द्राक्षे व्यापारी हेमंत दिलीप चव्हाण व मोहम्मद असरफ मोहम्मद सलमान यांनी संगनमत करून दिनांक 14 एप्रिल 19 एप्रिल या कालावधीत  विश्वासाने या शेतकऱ्यांचा माल  नेला. नंतर पैसे देतो असे त्यांना सांगितले परंतु पैसे न  देताच  या दोन्ही व्यापाऱ्यांनी  शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्याचे काम केले  आहे. त्यामुळे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत अर्जुन यशवंत जाधव यांनी फिर्याद दिली असून भा.द.वि. कलम 409 ,420, 34 प्रमाणे व्यापारी हेमंत दिलीप चव्हाण, मोहम्मद असरफ मोहम्मद सलमान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण अवचर हे करीत आहेत.
 पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हे द्राक्षाचे सर्वाधिक मोठे आगार  मानले जाते.परंतु याच गावात काही शेतकर्‍यांना टोपी घालण्याचे  काम या व्यापाऱ्यांनी केले असल्यामुळे मोठी घबराट निर्माण झाली आहे.  यापूर्वीही फसवणुकीच्या अशा अनेक घटना या व आसपासच्या परिसरात  घडल्या आहेत  त्यामुळे पोलिस प्रशासनाने व्यापाऱ्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे व त्यांनी अजून किती शेतकऱ्यांना गंडा घेतला याचा तपास करून त्यांना कडक शिक्षा करावी जेणे करून या पुढे अश्या घटनांना कायमचा आळा घातला जाईल.अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधून केली जात आहे.