महूद मध्ये सर्वात मोठी घरफोडी,चोरट्यांनी खिडकीचे गज कटरने कापून बंगल्यात केला प्रवेश,मारला 1 लाख रोकड व 51 तोळे सोन्यावर डल्ला
महुद,टीम---
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरफोडीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ होत असते. अशीच एक सर्वात मोठी घरफोडी महूद ता. सांगोला येथील अकलूज चौकातील शैलेश गांधी यांच्या बंगल्यात घडली आहे.अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या खिडकीचे गज कटरने कापून बंगल्यात प्रवेश केला व बेडरूमच्या कपाटाचे लॉक तोडून सुमारे 1 लाखाची रोकड व 51 तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे 27 लाखांचा ऐवज लंपास केला आहे.ही घटना शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली या घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी श्वानपथकाला व ठसे तज्ञांना बोलावले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की महुद येथील शैलेश गांधी यांचे महूद दिघंची रोडवरील अकलूज चौकात शैलेश गारमेंटस व निवास स्थान आहे. शुक्रवारी शैलेश गांधी हे रात्री दुकान बंद करून जेवण केल्यानंतर बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर कुटुंबासह झोपण्यासाठी गेले. दरम्यान शनिवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी खालच्या मजल्यावरील खिडकीचे गज कटरने कापून बंगल्याच्या आत प्रवेश केला.त्यावेळी चोरट्यांनी बेडरूमचे कपाटाचे लॉक तोडून 51 तोळे सोन्याचे दागिने व रोख 1 लाख रुपये लंपास केले आहेत. पहाटे चार वाजेच्या सुमारास शैलेश गांधी यांच्या पत्नीस जाग आली तेव्हा बेडरुमच्या कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांना दिसून आले त्यांनी पती शैलेश गांधी यांना उठवून घरात चोरी झाल्याचे सांगितले. घटनास्थळी पोलीस प्रशासनाने पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे. या चोरीमुळे संपूर्ण महूद परिसरात व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण चोरट्यांनी सर्वात मोठी घरफोडी या ठिकाणी केली आहे.