आरटीओ मोटार वाहन निरीक्षकाला धक्काबुक्की व दमदाटी,मोहोळ च्या चिंचोली एमआयडीसी मधील प्रकार,गुन्हा दाखल

आरटीओ मोटार वाहन निरीक्षकाला धक्काबुक्की व दमदाटी,मोहोळ च्या चिंचोली एमआयडीसी मधील प्रकार,गुन्हा दाखल
मोहोळ, टीम----
खताच्या पावडरने क्षमतेपेक्षा जास्त भरलेल्या मालट्रक वर कारवाई करण्यासाठी आलेल्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षकाला धक्काबुक्की करीत ढकलून देऊन दमदाटी केल्याप्रकरणी वाहनचालकाच्या विरोधामध्ये शासकीय कामांमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना दि.१७ मार्च रोजी चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये घडली. अखिल सत्तार शेख असे गुन्हा दाखल झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे.
      याबाबत मोहोळ पोलिस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहिती नुसार, चिंचोली काटी औद्योगिक वसाहतीमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्याचे काम चालू होते, दि.१७ मार्च रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान एम एच ४८ जे ०२५३ हा आयशर टेम्पो जादा क्षमतेने भरलेला दिसला. म्हणून प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरकारी वाहन क्र. एम एच ०४ ई पी १३०० यातून पाठलाग करून सदर आयशर टेम्पो थांबवला. गाडी थांबवून वाहन चालकाकडे चौकशी केली असता १२ हजार ९९० किलो भार वाहून नेण्याची वाहनांची क्षमता असताना त्या टेम्पोमध्ये १७ हजार ४४० किलो माल आढळून आला. यामध्ये ४ हजार ४५० किलो अधिकचा माल आढळून आल्याने सदर गाडीवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई करीत असताना सदरच्या वाहनाचा वाहनचालक अखिल सत्तार शेख (वय ३४), रा. सैफुल, सोलापूर याने मला पकडायचे नाही, माझ्या गाडीची पावती करायची नाही, असे म्हणत प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या हाताला धरून धक्काबुक्की केली म्हणून वाहन चालक शेख याच्या विरोधामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक संदीप सुभाष शिंदे यांनी शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याची फिर्याद दिली असून यानुसार सदर वाहनचालका वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार सूनील चवरे हे करीत आहेत.या प्रकारामुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.