पंढरीत 8 दिवसांची संचारबंदी "फिक्स",लोकप्रतिनिधीसह व्यापार्‍यांच्या मागणीला जिल्हा प्रशासनाचा मोठा खो

पंढरीत 8 दिवसांची संचारबंदी "फिक्स",लोकप्रतिनिधीसह व्यापार्‍यांच्या मागणीला जिल्हा प्रशासनाचा मोठा खो

शहरातील सर्व मठांची होणार पोलीस तपासणी


। पंढरपूर,टीम-------

आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त कोरोना महामारीमुळे पंढरपूरमध्ये दि. 17 जुलै ते 25 जुलै पर्यंत कडक संचार बंदी लावण्यात येणार आहे. ही संचार बंदी केवळ 3 दिवसांची असावी अशी मागणी जिल्ह्याचे आ. प्रशांत परिचारक व आ. समाधान आवताडे यांची केली होती. एवढेच नव्हेतर स्थानिक व्यापार्‍यांनी संचार बंदीला विरोध केला होता. मात्र 8 दिवसांच्या संचार बंदीवर जिल्हा प्रशासनाने शिक्कामोर्तब केला असून 8 दिवसांची संचारबंदी फिक्स राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


शहरातील संचार बंदी बाबत जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. या प्रसंगी बोलताना जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, संचार बंदी कमी करण्याची मागणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी व इतर अधिकार्‍यांनी चर्चा केली. परंतु ते शक्य नाही. दि. 17 जुलै रोजी 4 वा. नंतर संचार बंदी लागू होणार आहे. त्यामुळे नागरिकांना या दिवशी दिवसभर कामकाज करता येईल. मानाच्या पालख्या पोहचण्याच्या एक दिवस अगोदर पासून हि संचार बंदी प्रत्यक्षात लागू होईल. 25 जुलै पर्यंत सर्व मानाच्या पालख्या पंढरीत मुक्कामी राहणार आहेत. त्या दृष्टीने कालावधी कमी करण्यासाठी चर्चा व प्रयत्न केले. या काळात नागरिकांनी विनाकारण शहरात येवून नये.

सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका व पंढरपूर शहराच्या बॉर्डरवर त्रिस्तरीय नाकाबंदी राहणार असून या व्यतिरीक्त मंदिर परिसर व नगर प्रदक्षिणा भागामध्ये योग्य तो बंदोबस्त लावण्यात येणार आहे. याही वर्षी काही रस्ते बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे. असे सांगत आठ दिवसांची संचार बंदी कायम राहणार असून मठांमध्ये रात्रा काळात राहणार्‍यांची कडक तपासणी करणार असल्याचे  स्पष्ट निर्देष जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.

यामुळे व्यापार्‍यांसह लोकप्रतिनिधीनीं केलेल्या मागणीला हा मोठा खो असल्याचे पहावयास मिळत आहे. या प्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आदी उपस्थित होते.